मराठवाड्याला खास पॅकेज द्या

By Admin | Published: September 13, 2015 02:36 AM2015-09-13T02:36:57+5:302015-09-13T02:36:57+5:30

केंद्र सरकारने बिहारला नुकतेच सव्वाशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळात होरपळून निघत असून खास बाब म्हणून मराठवाडा

Give special package to Marathwada | मराठवाड्याला खास पॅकेज द्या

मराठवाड्याला खास पॅकेज द्या

googlenewsNext

औरंगाबाद : केंद्र सरकारने बिहारला नुकतेच सव्वाशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले. मराठवाड्यातील शेतकरी भीषण दुष्काळात होरपळून निघत असून खास बाब म्हणून मराठवाडा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही तशीच मदत मिळाली पाहिजे, असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे व्यक्त केले.
उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी खुलताबाद येथे जिल्ह्यातील एक हजार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मराठवाड्यात आतापर्यंत एवढा भीषण दुष्काळ कधी पडलेला नाही. शेतकऱ्यांना जगणे मुश्कील झाले आहे. अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी पॅकेजरुपी मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी करण्यात येईल.
मध्यंतरी केंद्राचे पथक मराठवाड्यात येऊन गेले. त्याने पाहणीचा फार्स केला, पण आता फार्सबाजी करुन चालणार नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी राज्य सरकारने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी, अशी शिवसेनेची मागणी असल्याचे ठाकरे म्हणाले. (प्रतिनिधी)

‘जेलभरो’पेक्षा शेतकऱ्यांच्या चुली पेटवा
मराठवाड्यात दुष्काळ असताना जेलभरो करण्यापेक्षा शेतकऱ्याला कशी मदत करता येईल. त्यांच्या चुली कशा पेटविता येतील याचा विचार करावा, अशी सूचना उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना केली. दुष्काळग्रस्तांना पाणी देण्याच्या मुद्यावर अजित पवार काय बोलले होते, याचीही आठवण त्यांनी करून दिली.

प्रत्येक गावात पथक
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी शिवसेना प्रत्येक गावात उभारी पथक स्थापन करणार आहे. पथक गावातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करील. त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
कन्यादान योजना
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कन्यादान योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळे घेतली जातील. त्याचा खर्च शिवसेना करेल.

Web Title: Give special package to Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.