ज्येष्ठांना निवडणुकीपूर्वी विशेष पॅकेज द्या!
By admin | Published: January 18, 2017 02:33 AM2017-01-18T02:33:10+5:302017-01-18T02:33:10+5:30
आताच काय ते ज्येष्ठांसाठी विशेष पॅकेज द्या, जेणेकरून नंतर पाच वर्षे कार्यालयांच्या पायऱ्यांवर काठी टेकवायला नको
मुंबई : निवडणुकीच्या तोंडावर रोज दिसणारा नगरसेवक निवडून आल्यानंतर मात्र दिसेनासा होता. त्यामुळे आताच काय ते ज्येष्ठांसाठी विशेष पॅकेज द्या, जेणेकरून नंतर पाच वर्षे कार्यालयांच्या पायऱ्यांवर काठी टेकवायला नको, असे मुलुंडमधील आजोबांचे म्हणणे आहे.
मुलुंड पूर्वेकडील म्हाडा कॉलनीच्या पदपथावर नगरसेवकाने ज्येष्ठांसाठी आसनव्यवस्था करून दिली. मात्र, काही वर्षाने येथील आसनव्यवस्थेवर बसणे ज्येष्ठांना अवघड झाले. आसनव्यवस्थेची दुरवस्था झाली. त्यांनी नगरसेवकांकडे पुन्हा धाव घेतली. पाठपुराव्याअंती नवे बाकडे बसविण्यात आले. मात्र, पूर्वीचे बाकडे तसेच तुटलेल्या अवस्थेत पडून होते. ते न काढल्यामुळे त्यांच्या डोकेदुखीत आणखीन भर पडली. अखेर या ज्येष्ठ मंडळींनी एका मजुराला खिशातून ५० रुपये देऊन हे बाकडे हटविण्याची वेळ आली. मंगळवारी त्यांनी हे बाकडे हटविले. मात्र, आचारसंहिता असल्यामुळे आजूबाजूला उखडलेले पेव्हर ब्लॉक एक समान करणे शक्य नसल्याचे नगरसेवकाने सांगितले आहे. त्यामुळे किमान निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत या मंडळींना या खड्डेयुक्त पदपथावरील आसनव्यवस्थेवर वेळ घालवावा लागणार आहे. जवळपास १५ ते २० ज्येष्ठ नागरिकांसाठी हा एक कट्टा बनला आहे.
बँक, सरकारी नोकरी, हॉस्पिटल, पालिका अशा विविध ठिकाणांतून ही मंडळी निवृत्त झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळी विरंगुळा म्हणून ही मंडळी एकत्र येतात. त्यांच्यातही निवडणुकीच्या गप्पा रंगलेल्या. सगळेच जण पैसे देऊन मतदारांना आपल्याकडे ओढतात आणि गरज संपली की, लाथ मारतात. त्यामुळे ‘खिसा गरम झाला की मतदानाचा विचार करू’ असे मिश्कील मत ८० वर्षांचे आजोबा बी.एस. पांचाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडले.
आता फक्त कामापेक्षा फक्त पैसा म्हणून निवडणुकीकडे पाहिले जात असल्याचे, ७० वर्षांचे रवीकांत राणे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे नगरसेवकाने नेहमीच नागरिकांच्या मदतीसाठी हजर राहावे, अशी माफक अपेक्षा ते करत आहेत. ज्येष्ठांना बसण्यासाठी शेड असलेली आसनव्यवस्था, वाचनालयाची सोय करावी, अशी मागणी येथील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली आहे.