दीड लाखावरील कर्ज भरण्यासाठी शेतक-यांना १० वर्षांची मुदत द्या - शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 03:48 AM2017-10-20T03:48:36+5:302017-10-20T03:48:56+5:30
राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम
सोलापूर : राज्य शासनाने केलेली कर्जमाफी ही दीर्घमुदतीच्या कर्जदारांना लाभदायक नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या शेतक-यांच्या कर्जापोटी प्रारंभी दीड लाख रुपये शासनाने भरावेत व उर्वरित रक्कम भरण्यासाठी १० वर्षांची मुदत द्यावी, अशी सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली.
वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांच्या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख होते.
प्रारंभी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफी करताना शरद पवार यांचा सल्ला मुख्यमंत्र्यांनी घेतला होता असे सांगून आजही पवार यांनी कर्जमाफीबाबत सूचना केल्या तर त्याचा विचार करु, असे सांगितले.
पवार म्हणाले, ‘शासनाने शेतक-यांचे कर्ज माफ करण्याची भूमिका घेतली आहे. ही माफी अल्पभूधारक आणि पीक कर्ज घेतलेल्या शेतक-यांना लाभदायक असली तरी फळबागा अथवा इतर पिकांसाठी कर्ज घेतलेल्या मोठ्या शेतक-यांना याचा लाभ होत नाही. दीड लाखापेक्षा अधिक थकबाकी असणा-या कर्जदारांना याचा लाभ घ्यायचा असेल तर उर्वरित रक्कम अगोदर बँकेत भरावी लागणार आहे. इतकी रक्कम जर शेतक-यांकडे असली असती तर ते कर्जदार कशासाठी झाले असते?
मोठ्या थकबाकीदार शेतक-यांना कोणी विचारत नाही. वीज, पाणी, खते वेळेवर द्या व उत्पादित धान्याला भाव द्या, शेतकरी कधीच थकबाकीदार होणार नाही, असेही पवार यांनी सांगितले.