Maharashtra Political Crisis: ठाकरे सरकार परीक्षा द्या! भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट; अधिवेशन घेण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 06:29 AM2022-06-29T06:29:35+5:302022-06-29T06:30:53+5:30
फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेत्यांनी रात्री राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले.
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचे बहुमत सिद्ध करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घ्यावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे मंगळवारी रात्री केली. राज्यपाल आता विशेष अधिवेशन कधी बाेलवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यपालांनी तसे आदेश विधानमंडळ सचिवांना दिले असल्याचे एक पत्र ही भेट सुरू असतानाच सोशल मीडियात व्हायरल झाले. मात्र, हे पत्र खोटे असून तसे कोणतेही आदेश राज्यपालांनी दिलेले नाहीत, असे राजभवनकडून रात्री उशिरा स्पष्ट करण्यात आले.
रात्री उशिरा घडामाेडींना वेग -
- फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आशिष शेलार आदी नेत्यांनी रात्री राज्यपाल कोश्यारी यांना निवेदन दिले.
- महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या ४९ आमदारांनी सरकारपासून दूर जाण्याची भूमिका घेतली आहे. ९ मंत्र्यांना पदावर कायम ठेवून त्यांची खाती अन्य मंत्र्यांना देण्यात आली आहेत.
- सरकारवरील अस्थिरतेचे सावट स्पष्ट दिसत आहे. राज्यासाठी अशी परिस्थिती अजिबात हितावह नाही. राज्यातील सामान्य जनतेच्या मनातही सरकारच्या स्थैर्याविषयी शंकेचे वातावरण आहे.
- त्यामुळे नेमकी स्थिती काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करायला सांगावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने केली.
भाजप आमदार आजपासून मुंबईत -
भाजपच्या सर्व आमदारांना पुढील दोन दिवस मुंबईत राहण्याचे आदेश पक्षाने दिले आहेत. येत्या दोनतीन दिवसात वेगवान राजकीय हालचाली होवू शकतात, त्यामुळे तुम्ही मुंबईतच राहा असे त्यांना सांगण्यात आले आहे.
शिंदे यांच्या सोबत असलेले काही आमदार मुंबईत राज्यपालांची भेट घेत विश्वासदर्शक ठरावाची मागणी करतील असे म्हटले जात होते.
३९ आमदार बाहेर आहेत, त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये राहायचे नाही. राज्यातील आघाडी सरकार अल्पमतात आल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे या सरकारला व मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करायला सांगा, अशी विनंती आम्ही राज्यपालांना भेटून केली आहे. ते योग्य निर्देश देतील अशी अपेक्षा आहे.
- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते