तहानलेल्या पक्ष्यांना तुम्हीही द्या...चारा, पाणी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2019 03:16 AM2019-05-01T03:16:12+5:302019-05-01T03:16:45+5:30
राज्यभर उन्हाचा ताप; पक्षिमित्र संघटना, संस्थांच्या कामांना हातभार लावण्याचे नागरिकांना आवाहन
निशांत वानखेडे
नागपूर : उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असताना पशुपक्ष्यांची काय दयनीय अवस्था होत असेल? अन्नपाण्यावाचून अनेक पक्षी तडफडताना दिसत आहे. त्यांच्यासाठी दाणापाण्याची व्यवस्था करण्याची हीच वेळ आहे. याने अनेक पक्ष्यांना जीवदान मिळणार आहे.
विविध पक्षिमित्र संस्था, संघटना आणि निसर्गावर प्रेम करणारे काही संवेदनशील नागरिकांनी पक्ष्यांच्या घासपाण्यासाठी धडपडत आहेतच; परंतु त्यांच्या प्रयत्नांना हातभार लावण्यासाठी हजारो हात पुढे येण्याची आज गरज आहे.
गावखेड्यांमध्ये घराबाहेर पाणी ठेवलेले असायचे. राहिलेले अन्न अंगणात टाकल्यानंतर चिमण्या, बुलबुल अशा पक्ष्यांना ते खायला मिळायचे. शहरातील बंदिस्त घरात हे शक्य होत नाही. परंतु घराच्या गच्ची किंवा खिडक्यांमध्ये पक्ष्यांसाठी पाणी तसेच अन्न ठेवल्यास पक्ष्यांना त्याचा लाभ होऊ शकतो. घरातच नाही तर आपल्या फिरण्याच्या जागा येथील झाडांवर, झाडाखाली अन्नपाण्याची व्यवस्था केली जाऊ शकते. तुम्ही कामानिमित्त जिथे-जिथे जाता तिथे हे करणे शक्य आहे. हे चिमुकले प्रयत्न अन्न पाण्यासाठी तडफडणाऱ्या पक्ष्यांचे जीव वाचवू शकतात.
पाचोळा जाळू नका
उन्हाळ्याच्या दिवसात झाडांची पानगळ होत असते. हा पालापाचोळा झाडाखाली साचून असतो. पालापाचोळ्याखाली किडे, गांडूळ तयार होतात. ते खाण्यासाठी पक्ष्यांना मेजवानी असते. बºयाच वेळा हा कचरा झाडून जाळला जातो. पण हा कचरा जाळू नका व शक्यतो एका ठिकाणी जमा करून ठेवा, असे आवाहन पक्षिमित्रांनी केले आहे. एकतर धुरामुळे प्रदूषण होते शिवाय पक्ष्यांनाही ते त्रासदायक होते. या कचऱ्याखाली मिळणाऱ्या नैसर्गिक खाद्यापासून पक्षी वंचित राहतात.
घरी अशी करा व्यवस्था(पक्षीमित्र, अभ्यासक अविनाश लोंढे यांच्या काही मार्गदर्शक सूचना)
- घरी सावलीच्या ठिकाणी व पक्ष्यांना मुक्त वातावरण मिळेल अशा ठिकाणी मातीच्या पसरट भांड्यात पाणी ठेवावे. पक्ष्यांना आंघोळही करता येईल, असे भांडे असावे.
- पाण्यासोबतच अन्नाची व्यवस्थाही करता येईल. विशेषत: ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ आदी धान्याचा भरडा उत्तम ठरेल. यासह भाताचे शित व पोळ्यांचे बारीक तुकडे करून ठेवता येतील.
- पाणी आणि धान्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या, बरण्या, तार, दोरी, मातीचे भांडे आदींचा वापर करून फीडर तयार करता येईल. असे कृत्रिम फीडर आता बाजारातही उपलब्ध आहेत.
- उद्यानातील प्रत्येक झाडावर पाणी व धान्याची व्यवस्था करता येईल.
- झाडांच्या फांद्यांना धरून किंवा दोन खोडांच्या मध्ये असे पाण्याचे पात्र दोरीच्या मदतीने अडकविले जाऊ शकते.
- मातीचे पात्र बांधणे शक्य नसेल तर नारळाच्या करवंटीचा वापर केला जाऊ शकतो.
- झाडावर बांधणे शक्य नसेल तर झाडाखाली, झुडपात सावली राहील तिथे पाणी व धान्य ठेवावे.
- उद्यानात जाता-येताना आवर्जून सोबत पाणी घेऊन जा आणि झाडांना टांगलेल्या पात्रात ओता. घरून बाहेर निघताना सोबत पाणी ठेवा जेणेकरून शक्य होईल त्या पात्रात पाणी भरता येईल.
- जिथे पाण्याची व्यवस्था नाही अशा प्रत्येक ठिकाणी ज्यांना शक्य होईल त्यांनी पाण्याची व्यवस्था करावी.