वेळ द्या, नाहीतर बघून घेऊ , राज ठाकरे यांचा रेल्वेला इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 01:03 AM2017-10-03T01:03:32+5:302017-10-03T01:04:04+5:30
रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक प्रवासी संघटनांना वेळ देत नाहीत. हे चालणार नाही
डोंबिवली : रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडवण्यासाठी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक प्रवासी संघटनांना वेळ देत नाहीत. हे चालणार नाही. या बैठकांना वेळ द्या; नाहीतर बघून घेऊ, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी दिला. मनसेतर्फे ५ आॅक्टोबरला केल्या जाणाºया आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी प्रवासी संघटनांकडून प्रश्न समजून घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीतील २४ प्रवाशांच्या हत्याकांडाची गंभीर दखल ठाकरे यांनी घेतली असून या घटनेचा निषेध आणि प्रवाशांच्या समस्यांबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी मनसे ५ आॅक्टोबरला चर्चगेटच्या पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. तत्पूर्वी त्यांनी सोमवारी प्रवासी संघटनांच्या पदाधिकाºयांची भेट घेत सर्वसामान्य प्रवाशांच्या व्यथा जाणून घेतल्या. ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी ठाकरेंनी ही बैठक घेतली. मुंबईची उपनगरे विशेषत: ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना लोकल सेवेवरच अवलंबून रहावे लागते. त्यांना रेल्वेशिवाय कोणताही पर्याय नाही. समांतर रस्त्याचा अभाव असल्याने रेल्वे सेवा कोलमडली, की सुमारे ४० लाख प्रवाशांच्या रोजंदारीचा प्रश्न निर्माण होतो. कसारा, कर्जत मार्गावरील लाखो प्रवाशांना त्यांच्या रोजगारावर पाणी सोडावे लागते. गेल्या सहा महिन्यात रोज लेटमार्क होत असून रुळावरुन गाडी घसरणे, अपघात, सिग्नल यंत्रणा खराब, रेल्वे रुळाला तडे यासारख्या असंख्य घटनांमुळे प्रवासी हैराण झाले आहेत. सकाळी कामावर जाण्याचा प्रवास सुखकर झाला, तर रात्री घरी परतण्याच्या वेळी काही घोळ होतो का, असा ताण मनावर असतो. त्यात एल्फिन्स्टनची घटना घडली. पण त्याची जबाबदारी घेण्यास कोणी तयार नाही. आरोप-प्रत्यारोप करत अधिकारी एकमेकांवरील जबाबदारी ढकलून मोकळे होत आहेत. अशा स्थितीत सर्वसामान्य प्रवाशांचे काय? त्यांना कोणीही वाली नाही. पादचारी पुलांअभावी रेल्वे रुळ ओलांडण्यामुळे अपघात होत असतील; तर पादचारी पूल वेळेत तयार करा, अरुंद पुलांना मोठी जागा करुन द्या. स्थानकातील फेरीवाले, अस्वच्छ स्वच्छतागृहे, भटके कुत्रे, गर्दुल्ले यामुळे प्रवासी मेटाकुटीला आले आहेत. त्यासाठी मनसेने आवाज उठवला हे योग्य आहे. पण त्यात सातत्य हवे, अशी मागणी उपस्थित प्रवासी संघटनांच्या पदाधिकाºयांनी केली. हीच समस्या कमी-अधिक प्रमाणात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकांत आहे. त्यातही मध्य रेल्वेच्या दादर, ठाणे, कळवा, दिवा, डोंबिवली, आसनगाव, कसारा, बदलापूर, अंबरनाथ आदी स्थानकांमध्ये ती तीव्र आहे. प्रवासी रोज जीव मुठीत धरुन प्रवास करतात. त्यांना सुरक्षित, संरक्षित प्रवासाची हमी हवी आहे. ती मिळत नसल्याने समस्या वाढत असल्याचे सांगण्यात आले.
त्याच्याशी सहमत होत ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या समस्यांबाबत गांभीर्य नसल्याचे सांगितले. प्रवाशांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अधिकारी भेट कशी देत नाहीत, ते आपण बघूच. पुढील काळात सातत्याने बैठका होतील, असे आश्वासन त्यांनी दिले. ५ आॅक्टोबरला प्रवाशांनी जास्तीत जास्त संख्येने यावे आणि स्वत:लाच न्याय मिळवून देण्यासाठी थोडा वेळ काढावा, असे आवाहन त्यांनी प्रवासी संघटनांना केले.
पश्चिम रेल्वेसह विरार-डहाणूच्या प्रवासी संघटनांचे प्रतिनिधीही या बैठकीला आले होते. उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेच्या माध्यमातून सगळयांनी एकत्र यावे. मोर्चात सहभागी व्हावे आणि सगळयांच्या मागण्यांचे सामूहिक निवेदन तयार करावे. ते बुधवारी सकाळी द्यावे, असेही ठाकरे यांनी सुचवले.
या चर्चेवेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसेचे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, सरचिटणीस राजू पाटील, केडीएमसीतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे आदींसह ठाणे जिल्ह्यातील प्रवासी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
अपघात झाल्यास तातडीने रुग्णवाहिका मिळत नाही, असा मुद्दाही या चर्चेत समोर आला. न्यायालय तर ‘गोल्डन अवर’मध्ये उपचार मिळावे, अशी अपेक्षा करते. येथे तर गोल्डन अवरमध्ये रुग्णवाहिका मिळत नाही, याकडे संघटनांच्या प्रतिनिधींनी लक्ष वेधले. ग्रामीण भागाकडे रेल्वे लक्ष पुरवत नाही. तेथील प्रवाशांना भावना नाहीत का? तो प्रवासी रेल्वेला निधी देत नाही का? असे प्रश्न यावेळी उपस्थित झाले. रेल्वे स्थानकांतील समस्या, फेºया वाढवणे आदी मुद्देही प्रतिनिधींनी मांडले.
राष्ट्रवादीचा आज रेल रोको
रेल्वे प्रवाशाच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी सकाळी ९ वाजता कळवा स्थानकादरम्यान रेल रोको करण्यात येणार आहे. रेल्वे वाहतुकीचा विचार करून धीम्या मार्गावरील अप-डाऊन दिशेवर काही काळासाठी हे आंदोलन केले जाणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांना त्रास देणे, त्यांचा खोळंबा करणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश नाही. पण रेल्वे प्रशासनाने धडा घ्यावा. जास्तीत जास्त चांगल्या सुविधा द्याव्यात, याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.