अडीच हजार द्या अन् रेशनकार्ड न्या !
By admin | Published: May 18, 2016 01:36 AM2016-05-18T01:36:06+5:302016-05-18T01:36:06+5:30
कागदपत्रे असो अथवा नसो, आमच्याकडे आलात; तुमचे काम होणारच! म्हणाल तितक्या लवकर रेशनकार्ड देतोकागदपत्रे असो अथवा नसो, आमच्याकडे आलात; तुमचे काम होणारच! म्हणाल तितक्या लवकर रेशनकार्ड देतो
मंगेश पांडे, सुवर्णा नवले, किरण माळी,
पिंपरी- कागदपत्रे असो अथवा नसो, आमच्याकडे आलात; तुमचे काम होणारच! म्हणाल तितक्या लवकर रेशनकार्ड देतो, मात्र त्यासाठी अडीच हजार रुपये देण्याची तयारी ठेवा, अशी खुली आॅफर निगडीतील परिमंडल अधिकारी कार्यालय ‘अ’ विभागासमोर उभ्या असलेल्या एजंटांनी दिली. ही बाब मंगळवारी लोकमत प्रतिनिधींनी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून समोर आली.
निगडी येथील टिळक चौकातील संत तुकाराम व्यापार संकुलातील पहिल्या मजल्यावर ‘अ’ परिमंडल कार्यालय आहे. या इमारतीच्या बाहेरच एजंट घिरट्या घालत असतात. कोणीही व्यक्ती त्या परिसरात आला, तरी त्याला घेरले जाते. कार्यालयाच्या आवारातच नव्हे, तर कार्यालयाच्या दारात अन् कार्यालयाच्या आतही एजंटांंनी बस्तान मांडले आहे.
जड आवाजात ‘इकडे या. काय काम आहे? रेशनिंग कार्डचे काम मी करून देतो, कार्यालयात जाऊन काही उपयोग नाही. तिकडे काम दिल्यास महिनोन् महिने हेलपाटे मारावे लागतील,’ असे बोलून इमारतीच्या खालीच संबंधित नागरिकाला भांबावून सोडले जाते. नवख्या व्यक्तीला तर अक्षरश: दमात घेतले जातअसून,कागदपत्रे हातात घेऊन आलेली व्यक्ती एजंटांच्या नजरेतून सुटत नाही. कार्यालयाच्या परिसरात आल्या आल्या, त्याला बाजूला घेऊन दलाल एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे त्यांच्या हातातील कागदपत्रे ताब्यात घेतात. शिवाय हेलपाटे मारायचे असतील, तर कार्यालयात जा.
त्यापेक्षा माझ्याकडे द्या काही दिवसांतच करून देतो, असे ठोसपणे सांगितले जाते.
तासाभरात केले जाते काम
ज्या कामाला काही दिवस, महिने लागतात. तेच काम तासाभरात करून देतो, असा शब्द एजंटकडून दिला जातो. त्यानंतर पैसे आणि शिधापत्रिका घेतली, की थेट कार्यालयातील अधिकाऱ्याकडूनच एजंट काम करवून घेतो. अधिकारीदेखील रीतसर प्रक्रियेने आलेल्या कामापेक्षा दलालांकडून आलेल्या कामास प्राधान्य देत असल्याचे दिसून आले. अधिकाऱ्यांच्या टेबलासमोर बसूनच काम करतात.