दोन वर्षे पडून असलेली वाहने लाभार्र्थींना देणार
By Admin | Published: January 26, 2016 03:07 AM2016-01-26T03:07:16+5:302016-01-26T03:07:16+5:30
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्यांमुळे अडकून पडलेली वाहने लाभार्र्थींना देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने अखेर घेतला आहे
मुंबई : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातील घोटाळ्यांमुळे अडकून पडलेली वाहने लाभार्र्थींना देण्याचा निर्णय महामंडळाच्या संचालक मंडळाने अखेर घेतला आहे. ही वाहने धूळ खात पडली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने दिले होते.
मातंग समाजातील गरजूंना भाजीपाला विक्रीसाठी वाहने उपलब्ध करून देण्याची योजना २०१३ मध्ये आखण्यात आली होती. त्यासाठी राष्ट्रीय मागासवर्ग महामंडळाने ४ कोटी २० लाख, साठे महामंडळाने १ कोटी ४० लाख, महामंडळाच्या वैयक्तिक अनुदानापोटी १० लाख, तर लाभार्र्थींचा हिस्सा ३० लाख रुपये अशी आर्थिक तरतूद करण्यात आली होती. ६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पावर प्रत्यक्षात ७ कोटी ५० लाख रुपये खर्च करण्यात आले. हा जादाचा खर्च सध्या सीआयडीच्या चौकशी रडारवर आहे.
या निधीतून १०० वाहने खरेदी करण्यात आली होती. ती भाजीपाला विक्रीसाठी विशेष पद्धतीने बनविण्यात आली असून, वाहनांचा अर्धा भाग वातानुकूलित आहे.
दोन वर्षांपासून ठाणे आणि बोरीवलीतील दोन फर्मकडे ही वाहने नुसती पडून आहेत, यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला होता. या वाहनांच्या लाभार्र्थींची निवड ही स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आलेली होती. आता १०० पैकी २१ लाभार्र्थींना वाहने देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ती येत्या १५ दिवसांत प्रत्यक्ष ताब्यात दिली जातील, असे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले. आधी दोन निवडणूक आचारसंहितांमुळे हे वाहनवाटप अडले. नंतर महामंडळातील ३८५ कोटी रुपयांचे धक्कादायक घोटाळे ‘लोकमत’च्या मालिकेने उघडकीस आणल्यानंतर राज्य शासनाने कुठलेही आर्थिक निर्णय घेण्यास महामंडळाला मनाई केली होती. (विशेष प्रतिनिधी)