लातूरला उजनीतून पाणी देणार
By admin | Published: August 25, 2015 02:26 AM2015-08-25T02:26:27+5:302015-08-25T02:26:27+5:30
लातूरची पाणी टंचाई तीव्र आहे. त्यामुळे यात्रेकरुंसाठी राखून ठेवलेले उजनी धरणातील पाणी पंढरपूरमधून रेल्वेने लातुरला नेले जाईल,अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी
खडसेंची माहिती : कारखाने महत्त्वाचे की माणसे ?
मुंबई : लातूरची पाणी टंचाई तीव्र आहे. त्यामुळे यात्रेकरुंसाठी राखून ठेवलेले उजनी धरणातील पाणी पंढरपूरमधून रेल्वेने लातुरला नेले जाईल,अशी माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी लोकमतशी बोलताना दिली. उजनीचे पाणी सोलापूरला जाते. तेथून ते पंढरपूरला जाते. उजनी लातूर अंतर तुलनेने कमी आहे, पण रेल्वे मार्गाची सोय म्हणून पंढरपूरमार्गे हे पाणी लातूरला नेले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
उजनीचे पाणी लातुरला नेण्यास सोलापूरचे काँग्रेस नेते तीव्र विरोध करत आहेत याकडे लक्ष वेधले असता खडसे म्हणाले, मला काँग्रेस नेत्यांची कीव वाटते. एकीकडे दुष्काळग्रस्त भागाला पाणी मिळाले पाहिजे म्हणून राजकारण करायचे आणि दुसरीकडे आपल्या उसाचे पाणी कमी होऊ नये यासाठी स्वार्थी राजकारण करायचे. पाणी टंचाईच्या काळात लोक पाणपोया उघडतात. पाणी नाही म्हणू नये अशी आपली संस्कृती. पण माणसे अडचणीत आलेली असताना यांना उसाचे कारखाने जास्त महत्वाचे वाटतात, असा टोलाही खडसे यांनी लगावला. (विशेष प्रतिनिधी)