महिला प्रवाशांनो, १८२ हेल्पलाइनला द्या प्रतिसाद
By admin | Published: July 19, 2016 03:58 AM2016-07-19T03:58:01+5:302016-07-19T03:58:01+5:30
ट्रेनमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच उपस्थित होतो. अशा वेळी महिला प्रवाशांनी १८२ क्रमांकाच्या हेल्पलाइनची मदत घ्यावी
मुंबई : ट्रेनमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा नेहमीच उपस्थित होतो. अशा वेळी महिला प्रवाशांनी १८२ क्रमांकाच्या हेल्पलाइनची मदत घ्यावी, असे आवाहन करतांनाच, या हेल्पलाइनला अधिकाधिक लोकप्रिय करण्याचा निर्णय मध्य रेल्वे सुरक्षा दलाने घेतला आहे. या हेल्पलाइनला प्रवाशांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हेल्पलाइन जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरक्षा दलाकडून केला जात आहे. या संदर्भात आरपीएफकडून एका पत्रकार परिषदेद्वारे माहिती देण्यात आली.
मुंबई विभागात तुलनेने कमी प्रमाणात तक्रारी येतात आणि मदत मागितली जाते. त्यामुळे या हेल्पलाइनला जास्तीत जास्त प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी आरपीएफ जवानांना महिला सुरक्षा व संबंधित तक्रारींचा आढावा घेण्याचे नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. स् खासकरून महिला प्रवाशांनी त्यांच्या सुरक्षेसाठी या हेल्पलाइनची मदत घ्यावी, असे आवाहन आरपीएफचे महानिरीक्षक व मुख्य सुरक्षा आयुक्त ए. के. सिंह आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
>महिलांच्या डब्यात पुरुष प्रवाशांची घुसखोरी
महिला डब्यात पुरुष प्रवाशांची मोठ्या प्रमाणात घुसखोरी होते. त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे. २0१५ मध्ये १७ हजार १६१ जणांवर कारवाई करण्यात आली, तर २0१६ च्या जून महिन्यापर्यंत ८ हजार १६७ जणांवर कारवाई झाल्याची माहिती देण्यात आली.
महिला प्रवाशांच्या माहितीसाठी बुकलेट
महिला प्रवाशांच्या माहितीसाठी एक पुस्तिकाही तयार करण्यात आली आहे. त्याचे मध्य रेल्वे सुरक्षा दल आणि स्वयंसेवी संस्थेच्या वतीने अनावरणही करण्यात आले. यात एखादा प्रसंग उद्भवल्यास महिलेने त्या प्रसंगाला कसे तोंड द्यावे, तसेच ती परिस्थिती कशी हाताळावी, रेल्वे पोलिसांना त्याची माहिती कशी द्यावी इत्यादी माहिती यात आहे.