तुमच्या राजाला ‘सात’ द्या... घ्या दिले... , मनसेच्या प्रचारवाक्याची खिल्ली

By admin | Published: February 24, 2017 05:51 AM2017-02-24T05:51:05+5:302017-02-24T05:51:05+5:30

२०१२च्या महापालिका निवडणुकीत मुसंडी मारत सगळ्याच राजकीय पक्षांना धक्का देणाऱ्या

Give your sibling "seven" ..., ridicule MNS's campaign | तुमच्या राजाला ‘सात’ द्या... घ्या दिले... , मनसेच्या प्रचारवाक्याची खिल्ली

तुमच्या राजाला ‘सात’ द्या... घ्या दिले... , मनसेच्या प्रचारवाक्याची खिल्ली

Next

सुशांत मोरे / मुंबई
२०१२च्या महापालिका निवडणुकीत मुसंडी मारत सगळ्याच राजकीय पक्षांना धक्का देणाऱ्या मनसेला यंदा दोन अंकी संख्याही गाठता आली नाही. ‘तुमच्या राजाला ‘साथ’ द्या’ असे भावनिक गीत रचूनही मतदारांनी मनसेकडे पाठ फिरवली. अखेर मनसेला ‘सात’च्या आकड्यावरच समाधान मानावे लागले. कार्यकर्त्यांशी कमी पडलेला संवाद, ऐन निवडणुकीच्या तोंडावर मनसेला लागलेली गळती, अशा प्रमुख कारणांमुळे मनसेचे इंजिन ‘सायडिंग’लाच पडले.
२०१२ साली झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे २८ उमेदवार विजयी झाले होते, तेव्हा मनसे चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. २००७ सालीदेखील सात नगरसेवक निवडून आणत मनसेने दमदार एंट्री घेतली होती. २००७ आणि २०१२मध्ये शिवसेनेच्या जागा कमी होण्यात मनसेचा मोठा वाटा होता. मनसेचा फटका काँग्रेसलाही बसला होता.
पालिकेतील मनसेचा वाढता प्रभाव पुढेही वाढत राहील, अशी चिन्हे होती, पण २०१४च्या विधानसभेतील लाटेत मनसेचाही पत्ता साफ झाला होता. पालिकेत मोजकेच नगरसेवक छाप पाडू शकले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतर्गत बंडाळी मनसेची डोकेदुखी ठरली. २८ पैकी आठ नगरसेवकांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षात प्रवेश करून मनसेला खिंडार पाडले. ज्या उमेदवार, पदाधिकाऱ्यांवर निवडणुकीची भिस्त होती, त्यांनीच बंड पुकारले. त्यामुळे मनसेच्या नेत्यांना व्यूहरचनाही आखताना चांगलेच नाकीनऊ आले.
यंदा तब्बल २०३ उमेदवार देऊनही पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी अवघ्या तीन सभा घेतल्या. घरगुती कारण त्यामागे असल्याचेही सांगितले गेले, पण पक्षाला त्याचे नुकसान सोसावे लागले. मनसेने केवळ विलेपार्ले, विक्रोळी आणि दादरमध्ये सभा घेतल्या. मोठ्या विजयाची आशा आधीच सोडून की काय? असेच काहीसे चित्र होते. त्यानंतरही मनसे दोन अंकी संख्या गाठेल, असे राजकीय निरीक्षकांना वाटत होते. मात्र, ते भाकीतही फोल ठरले.
....आणि दादरही पडले
दादर, माहीम, माटुंग्यात २०१२ साली झालेल्या पालिका निवडणुकीत मनसेचे सात उमेदवार निवडून आले होते, परंतु यंदा फक्त एकाच जागेवर विजय मिळाला. भांडुप पश्चिम मनसेच्या दोन महिला उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. येथे मनसेचे
नेते शिशिर शिंदे यांचे वर्चस्व आहे. मनसेची हीच स्थिती पश्चिम उपनगरांतही
दिसून आली.


‘कृष्णकुंज’बाहेर शुकशुकाट

मनपा निवडणुकीत अवघ्या ७ जागांवर समाधान मानावे लागल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानाबाहेर आज शुकशुकाट होता.
गतनिवडणुकीत २८ जागा निवडून आणल्यानंतर कृष्णकुंजबाहेर दिवाळी साजरी करण्यात आली होती.
मात्र, या निवडणुकीतही मनसेच्या पदरी निराशाच पडल्याने ‘कृष्णकुंज’ आणि ‘राजगडा’कडे मनसैनिकांनी पाठ फिरवली.

सोडचिठ्ठीचा असाही सिलसिला
1विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार राम कदम यांनी सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे घाटकोपर परिसरात मनसेच्या वर्चस्वाला धक्का बसला.
2त्यानंतर, विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करलेल्या प्रवीण दरेकर यांनीही नंतर मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला आणि त्यामागोमाग त्यांचे भाऊ व मनसेचे नगरसेवक प्रकाश दरेकर यांनीही प्रवेश केला. त्यामुळे मागाठणेमध्येही वर्चस्व कमी झाले. प्रकाश दरेकर पक्षांतरानंतरही मात्र पराभूत झाले.
3विक्रोळीचे माजी आमदार आणि त्यापूर्वी नगरसेवक राहिलेले मंगेश सांगळे यांनीही मनसे सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. सांगळे यांना या वेळी भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली होती, परंतु सांगळे तेथेही पराभूत झाले.
4दादरमधील कट्टर मनसैनिक अशी ओळख असलेले प्रकाश पाटणकर यांनीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश केला.
5 पालिका निवडणुकीपूर्वी नगरसेवक चेतन कदम आणि मनसे नेते संजय घाडी आणि त्यांची पत्नी संजना घाडी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बोरीवली, दहिसर, मागाठणेमधील वर्चस्वाला धक्का बसला.

Web Title: Give your sibling "seven" ..., ridicule MNS's campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.