'इंडिया'मध्ये या, तुम्हाला पंतप्रधान करू; भाजपा नेते नितीन गडकरींना खुली ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 05:35 PM2023-08-20T17:35:40+5:302023-08-20T17:36:37+5:30
नितीन गडकरी यांना हतबल केलेले आहे. भाजपाचे दुकान तेजीत आहे. परंतु दुकानात सर्व चायनीज माल असं राऊतांनी म्हटलं.
हिंगोली – भाजपाचे वरिष्ठ नेतृत्व आता नितीन गडकरींना संपवण्यासाठी निघाले आहेत. अख्ख्या देशात भ्रष्टाचाराची राजवट सुरू आहे. कोविड काळात पीएम केअर फंडातून किती हजार कोटींचा भ्रष्टाचार केला ते विचारायचं नाही. जनतेच्या पैशाचा हिशोब द्यायचा नाही. अनेक खात्यातील भ्रष्टाचार उघड झाला नाही. परंतु देशातील ५ नवीन प्रकल्पाबाबत केंद्राच्या कॅगने अहवाल दिला. त्यात सार्वजनिक बांधकाम खात्यातील २ भ्रष्टाचार उघड केले. पर्यायाने नितीन गडकरींकडे असणाऱ्या खात्यातील भ्रष्टाचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तो उघड केला. मराठी माणसाच्या द्वेषातून हे केले असा आरोप ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी केला.
विनायक राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील एक नेतृत्व असलेले नितीन गडकरी लोकप्रिय होतायेत. उद्या पंतप्रधानपदाचे ते दावेदार होतील म्हणून नतद्रष्ट नेत्यांनी नितीन गडकरींना संपवण्यासाठी असलेला हा कट आहे. पण हा कट उधळून लावण्याचे काम महाराष्ट्र करेल. नितीन गडकरींना आमची विनंती आहे, तुम्ही मराठी माणसाचे पाणी दाखवा. कशाला घाबरता त्यांना? तुम्ही आवाज द्या, इंडियामध्ये या, तुम्हाला पंतप्रधान केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हा शब्द उद्धव ठाकरेसुद्धा देतील अशा शब्दात त्यांनी गडकरींना खुली ऑफर दिली.
तसेच नितीन गडकरी यांना हतबल केलेले आहे. भाजपाचे दुकान तेजीत आहे. परंतु दुकानात सर्व चायनीज माल. अजितदादा चायनीज, गद्दार चायनीज, ४ दिवस चमकतील नंतर लाईट बंद होईल. वापरा आणि फेकून द्या असं धोरण असलेल्या भाजपाने ज्यारितीने उद्धव ठाकरेंशी बेईमानी केली त्यापेक्षाही जास्त बेईमानी सध्याचे मुख्यमंत्री आणि ४० गद्दार यांच्याशीही करणार, येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांना घरी जाऊन बसावे लागणार आहे. तिकीटे देणार नाहीत असा आरोपही खासदार विनायक राऊत यांनी केला.
दरम्यान, भाजपाला गल्लीगल्लीत जाऊन मतांची भीक मागावी लागते हे भाजपाचे, मोदींचे दुर्दैव आहे. राज्यातील सरकार शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचे काम करतेय. ५ टक्के कांदा उत्पादकांना अनुदान मिळाले बाकीच्यांच्या तोंडाना पानं पुसली, शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केंद्र, राज्य सरकारने केले नाही. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करणे थांबले नाही. त्यामुळे लोकांना दिलासा देणारं शासन हवं ते राज्यात नाही असंही खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.