बालकांना मिळाले जीवदान
By admin | Published: November 4, 2016 01:04 AM2016-11-04T01:04:24+5:302016-11-04T01:04:24+5:30
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या डायल १०८ सेवेच्या रुग्णवाहिकेमध्ये आतापर्यंत राज्यभरातील तब्बल ११ हजार २६९ बालकांनी जन्म घेतला
पुणे : महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसच्या डायल १०८ सेवेच्या रुग्णवाहिकेमध्ये आतापर्यंत राज्यभरातील तब्बल ११ हजार २६९ बालकांनी जन्म घेतला असून, ही सेवा माता व बालकांसाठी वरदान ठरल्याचे चित्र आहे.
शासनाने २६ जानेवारी २०१४ रोजी ही इमर्जन्सी सेवा चालू केली होती. तेव्हापासून ३० सप्टेंबरपर्यंत म्हणजे जवळपास २ वर्षांत राज्यभरातून या सेवेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. विविध आपत्कालिन परिस्थितीमध्ये अडकलेल्यांनी या सेवेला सुरुवातीपासून उत्तम प्रतिसाद दिला आहे. नागरिकांनी जीवावर बेतणाऱ्या कोणत्याही आपत्कालिन परिस्थितीत १०८ हा क्रमांक डायल केल्यास विनामूल्य सेवा देणारी सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह आपण सांगितलेल्या ठिकाणी येते. यामध्ये अपघात, हृदयविकार, भोवळ येणे, अर्धांगवायू, विषबाधा, आगीत भाजणे अशा अनेक प्रकारच्या आपत्कालीन स्थितीमध्ये ही रुग्णवाहिका बोलावता येते.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आणि बीव्हीजी इंडिया लिमिटेड
या सेवा क्षेत्रातील कंपनीच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (डायल १०८) सेवेच्या वतीने अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा ९३७ रुग्णवाहिका या सेवेसाठी राज्याकडे उपलब्ध आहेत. यामध्ये २३३ ‘अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका असून, ७०४ ‘बेसिक लाईफ सपोर्ट’ रुग्णवाहिका समाविष्ट आहेत. याबाबत माहिती देताना महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य संचालन अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके म्हणाले, की ग्रामीण भागामध्ये काही वेळा दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्याने आजही बाळंतपणात होणाऱ्या अपघातांची संख्या जास्त आहे.
बाळंतपणाच्या कळा सुरू होणार असे वाटल्यानंतर गर्भवती महिलेच्या कुटुंबीयांनी १०८ सेवेशी संपर्क
केल्यास पुढील त्रास वाचू शकतो. त्यामुळे रुग्णवाहिका बोलावण्यास उशीर न केल्यास गरजू महिलेला वेळेत मदत मिळून मातामृत्यू व अर्भकमृत्यू टाळता येणे शक्य आहे.
(प्रतिनिधी)
>महिलांना वरदान : नाशिकमध्ये ७३१ बालकांचा रुग्णवाहिकेत जन्म
राज्यातील एकूण ३५ जिल्ह्यांमध्ये ही सेवा असून, रुग्णवाहिकेत प्रसूती झालेली आकडेवारी मोठी आहे. यातही नाशिक जिल्हा आघाडीवर असून, २ वर्षांत नाशिकमधील ७३१ बालकांनी रुग्णवाहिकेत जन्म घेतला आहे. तर, त्या खालोखाल पुण्यातील ७०२ बालकांनी रुग्णवाहिकेत जन्म घेतला असल्याचे यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीवरून समोर आले आहे. अशाप्रकारे बाळंतपणासाठीही ही सेवा वरदान ठरली असून, राज्यभरातील महिलांनी त्याचा लाभ घेतला आहे.
जानेवारी २०१४ च्या अखेरीस सुरू झालेल्या या अत्याधुनिक वैद्यकीय सेवेसाठी १०८ या दूरध्वनी क्रमांकावर डायल केल्यास सुसज्ज रुग्णवाहिका डॉक्टरांसह येते. ही सेवा २४ तासांसाठी उपलब्ध असून, कोणत्याही आपत्कालिन प्रसंगी दूरध्वनी केल्यास ही रुग्णवाहिका वैद्यकीय मदत पुरवते आणि नजीकच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करते. त्यामुळे शासनातर्फे चालविल्या जाणाऱ्या या सेवेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
- डॉ. ज्ञानेश्वर शेळके,
महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे मुख्य संचालन अधिकारी