ग्लोबल सिटिझन महोत्सव प्रथमच होणार मुंबईत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2016 01:40 AM2016-10-21T01:40:34+5:302016-10-21T01:40:34+5:30
संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ््यापुढे ठेवून भारताला भेडसावणाऱ्या गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता
मुंबई : संयुक्त राष्ट्रसंघाने ठरविलेली शाश्वत विकासाची उद्दिष्टे डोळ््यापुढे ठेवून भारताला भेडसावणाऱ्या गरिबी, दर्जेदार शिक्षण, लैंगिक समानता, पिण्याचे पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता यासारख्या प्रमुख समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि समाजधुरिणांच्या संयुक्त प्रयत्नांतून एक लोकचळवळ उभी करण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून पुढील महिन्यात मुंबईत ‘ग्लोबल सिटिझन्स’ महोत्सवाचे आयोजन होत आहे.
हा महोत्सव येत्या १६ नोव्हेंबर रोजी होणार असून अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरानंतर त्याच्या आयोजनाचा मान मिळणारे मुंबई हे पहिले शहर आहे. ‘ग्लोबल सिटिझन’ हे सामाजिक चळवळीचे व्यासपीठ आणि ‘दि ग्लोबल एज्युकेशन अॅण्ड लीडरशिप फौंडेशन’ यांच्यातर्फे हा अभिनव उपक्रम हाती घेतला जातो. त्यांच्या ‘ग्लोबल सिटिझन इंडिया’ या भारतीय शाखेतर्फे मुंबईतील या महोत्सवाचे आयोजन होईल. महाराष्ट्र सरकार व संयुक्त राष्ट्र संघ यांच्या सहकार्याखेरीज इतरही अनेक संस्था त्यात सहभागी असणार आहेत. ‘दै. लोकमत’ या महोत्सवाचा मराठीतील ‘मीडिया पार्टनर’ असणार आहे.
या महोत्सवाची जोरदार तयारी सुरु आहे. त्याशिवाय यासाठी तयार करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर अवघ्या महिनाभरात लोकांनी एक कोटी पाने भरतील एवढी आपली मतके नोंदविली आहेत व सन २०३० पर्यंत दारिद्र््याचे निर्मलन करण्याच्या १० लाखांहून अधिक कृतीकल्पना मांडल्या आहेत. यापैकी निवडक १८ हजार लोकांना महोत्सवासाठी नि:शुल्क तिकिटे वाटण्यात आली असून आणखी अशा ४० हजार तिकिटांचे वाटप व्हायचे आहे.
मुख्य महोत्सवाला जोडूनच स्वच्छ भारत, लैंगिक समानता यासह अन्य अनुषंगिक विषयांवर स्वतंत्र कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या निमित्ताने विदेशातून आठ हजार तर देशातून २५ हजार लोक येतील आणि त्यातून पर्यटन व हॉस्पिटॅलिटी उद्योगाची सुमारे १३० कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज आहे. (प्रतिनिधी)
२७ अब्ज डॉलरची घोषणा : सन २०१२ मध्ये सुरुवात झाल्यापासून ‘ग्लोबल सिटिझन’च्या व्यासपीठावरून २७ अब्ज अमेरिकन डॉलर एवढ्या रकमेची कटिबद्धता जाहीर करण्यात आली आहे. त्यातून होणाऱ्या कामांतून जगभरातील ७३ कोटी लोकांचे जीवन प्रभावित होईल, अशी अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन, अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मिचेल ओबामा, बिल आणि मेलिंडा गेट््स, महाराणी रानिया, संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस बान कि मून व नेपाळ आणि नॉर्वेच्या पंतप्रधांनी याआधी न्यूयॉर्कमध्ये कटिबद्धता जाहीर केली आहे.