World Sexual Health Day: नागपुरातील सेक्सवर्कर्स झाल्या आरोग्याबाबत ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 01:23 PM2018-09-04T13:23:42+5:302018-09-04T13:41:11+5:30
नागपुरातील बदनाम पण नेहमीच चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय ठरलेल्या गंगा जमुना या वस्तीतील सेर्क्सवर्कर्स आपल्या लैंगिक आरोग्याबाबत आता जागरूक झाल्या असल्याची वस्तुस्थिती आहे.
वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नागपुरातील बदनाम पण नेहमीच चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय ठरलेल्या गंगा जमुना या वस्तीतील सेर्क्सवर्कर्स आपल्या लैंगिक आरोग्याबाबत आता जागरूक झाल्या असल्याची वस्तुस्थिती आहे. या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेत प्रकल्प व्यवस्थापक असलेल्या हेमलता लोहवे पांडे यांनी ही माहिती देताना, कंडोमशिवाय आता या सेक्सवर्कर्स आपले काम करण्यास सरळ स्पष्ट नकार देतात व लैंगिक आरोग्याबाबतच्या कुठल्याही प्रश्नाबाबत त्या खूप सजग असल्याचे सांगितले.
या भागात आपण २००४ साली जेव्हा काम सुरू केले तेव्हा येथे लैंगिक आरोग्याबाबत अनास्थाच जास्त होती. त्याची भीती वाटत असली तरी त्याबाबत काळजी घेण्याचे भान नव्हते. हळूहळू येथील सेक्सवर्कर्सला लैंगिक आरोग्याची माहिती देत देत त्याबाबत त्यांना जागरूक करण्यात आले. त्या वेळची पिढी आता बदलून नवीन पिढी येथे आली आहे. ही पिढी अधिक जागरूक आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळेही त्यांना बऱ्याच गोष्टी कळत असतात. गेल्या आठ वर्षांपासून त्यांना रेड क्रॉसतर्फे लैंगिक शिक्षणाचे ट्रेनिंग दिले जात आहे. या सेक्सवर्कर्स आता एकमेकींशी लेैंगिक आजाराबाबत स्पष्टपणे बोलतात व तात्काळ डॉक्टरांचा सल्ला व उपचार घेतात. या महिलांना अनेक आजार होण्याची शक्यता असते. मात्र एखाद्या आजाराबाबत थोडीशी जरी शंका आली तरी त्या डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करतात. या क्षेत्रात नव्यानेच आलेल्या मुलीलाही त्या लैंगिक आरोग्याचे सर्व शिक्षण व खबरदारीचे उपाय सांगत असतात. दुसरे म्हणजे, एखाद्या लैंगिक आजारावर आता घरगुती उपाय येथे कोणीच करत नाही. सर्वजण डॉक्टरांचाच सल्ला घेतात. या सेक्सवर्कर्सकडे येणाऱ्या पुरुषांमध्येच जागरुकतेचा अभाव आढळत असल्याचे लोहवे यांनी सांगितले.
जागतिक लैंगिक आरोग्य दिनाविषयी..
/>वर्ल्ड असोसिएशन फॉर सेक्श्युअल हेल्थने जागतिक लैंगिक आरोग्य दिन हा प्रथम २०१० साली सप्टेंबरच्या ४ तारखेला साजरा करण्याचे निश्चित केले. त्यानुसार दरवर्षी या दिवशी एक घोषवाक्य या क्षेत्रातील संस्थाना दिले जाते. यंदाचे घोषवाक्य हे, सेक्श्युअल हेल्थ अॅन्ड राईटस ; फंडामेंटल फॉर वेल बिर्इंग असे आहे.