जागतिक साखर उत्पादन कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 01:21 PM2019-10-05T13:21:48+5:302019-10-05T13:27:31+5:30
गेली सलग दोन वर्षे देशामधे विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे..
पुणे : ब्राझीलसह जगातील साखर उत्पादक देशांमध्ये यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. जागतिक खपापेक्षा ६३ लाख टन साखर कमी उत्पादित होईल. त्याचा फायदा घेऊन कारखान्यांनी कच्ची साखर निर्यातीची प्रक्रिया पूर्ण करून, नव्या निर्यात करारासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी केले आहे.
गेली सलग दोन वर्षे देशामधे विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदादेखील देशाच्या २६० लाख टन वार्षिक मागणीपेक्षा अधिक उत्पादन होणार आहे. शिलकी साखरेमुळे बाजारावर होणारा परिणाम लक्षात घेता सरकारने साखरेपासून इथेनॉलनिर्मितीस प्रोत्साहन दिले आहे. तसेच, प्रथमच विक्रमी ६० लाख टन साखर निर्यातीची योजना १२ सप्टेंबरला जाहीर केली असून, त्याची अंमलबजावणी १ ऑक्टोबर २०१९ ते ३० सप्टेंबर २०२० या वर्षभरात होणार आहे. कारखानानिहाय साखर निर्यातीचा कोटा देशातील सर्व ५३५ कारखान्यांना कळविला आहे.
जागतिक स्तरावर साखर उत्पादनात द्वितीय क्रमांकावर असणाऱ्या ब्राझीलमधे २५५ लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज आहे. त्याचबरोबर थायलंड, युरोपियन युनियन, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान व भारत अशा प्रमुख देशांमधूनदेखील येत्या हंगामात कमी साखर उत्पादन होणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर साखरेचे दर टिकून राहतील. या स्थितीचा फायदा घेऊन गोदामातील शिल्लक पांढरी साखर व नव्या हंगामातील कच्ची साखर जास्तीत जास्त निर्यात करणे चांगले असल्याचे नाईकनवरे म्हणाले.
चीन, इंडोनेशिया, बांगलादेश, मलेशिया, कोरिया व श्रीलंका या देशांमधून असणाºया कच्च्या साखरेची मागणी भागविण्यासाठी भारतीय साखर उद्योगाला सुवर्णसंधी आहे. नोव्हेंबरमध्ये ब्राझीलचा हंगाम संपतो. त्यानंतर मार्चपर्यंत भारताशिवाय इतर देशांमधून साखरेची उपलब्धता फारशी नसेल. तेव्हा जरी कच्च्या साखरेला मिळणारा कारखानास्तरावरील दर कमी असला तरी कच्ची साखरनिर्मिती व निर्यातीमधूमन होणारी आर्थिक बचत, व्याजाची बचत, रिकव्हरीमधील वाढ व सरसकट मिळणारे अंतर्गत, तसेच जहाज वाहतूक अनुदान लक्षात घेता देशातील सहकारी साखर कारखान्यांनी हंगाम सुरुवातीलाच कच्च्या साखरेची निर्मिती करून त्याचे आगाऊ निर्यात करार करून घ्यावेत, असे आवाहन राष्ट्रीय सहकारी साखर महासंघाने केले आहे.
............
कच्च्या साखरेचे आंतरराष्ट्रीय दर प्रतिपाउंड १२.७५ सेंट्स ( कारखाना स्तरावर १८०० रुपये प्रतिक्विंटल) व पांढºया साखरेचे दर ३४१ डॉलर प्रतिटन (कारखानास्तरावर २२०० रुपये प्रतिक्विंटल) असे आहेत. आॅक्टोबर महिन्यासाठीचा स्थानिक बाजारातील साखर विक्रीचा कोटा २१ लाख टन आहे.
...........
सध्या कारखानास्तरावरील स्थानिक साखर विक्रीचे दर ३२०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. निर्यातीला सरकारकडून १०४५ रुपये प्रतिक्विंटल मदतीमुळे साखर निर्यात करणेच श्रेयस्कर राहील, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी व्यक्त केले.
.......
साखर निर्यातीसाठी केंद्र शासनाकडून सरसकट रु.१०४५ प्रतिक्विंटल मदत
जागतिक पातळीवरील मागणीच्या तुलनेत ६३ लाख टनांनी उत्पादन कमी होण्याचा अंदाज
जागतिक पातळीवरील बदलाचा भारताला होणार फायदा
.........
साखर महासंघ : कारखान्यांनी
साखर निर्यातीची प्रक्रिया पूर्ण करावी