जलमित्र अभियानात ‘ग्लोरिआ’चा पुढाकार
By admin | Published: May 19, 2016 02:38 AM2016-05-19T02:38:08+5:302016-05-19T02:38:08+5:30
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी भायखळ्यातील ‘ग्लोरिआ’ हॉटेलही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात सामील झाले आहे.
मुंबई : पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी भायखळ्यातील ‘ग्लोरिआ’ हॉटेलही ‘लोकमत’च्या जलमित्र अभियानात सामील झाले आहे. आधीपासून पाणीबचतीचा मार्ग अवलंबलेले ग्लोरिआ आता जलमित्रच्या टेंट कार्ड आणि स्टँडीमधून जलजागृती करत आहे.
भायखळा पूर्वेकडील ग्लोरिआ हॉटेलने ग्लासातील थेंबभर पाणीही वाया न घालविण्याचा निर्धार केला आहे. बहुतेक हॉटेलमध्ये पाणी बचतीसाठी ग्राहकांना अर्धाच
ग्लास पाणी देण्यात येत आहे. मात्र, ग्राहकांनी पाणी प्यायल्यानंतरही उरलेले पाणी फेकून दिले जाते. ग्लोरिआ हॉटेलच्या मालकांनी उरलेल्या प्रत्येक पाण्याचा वापर करण्याची यंत्रणा उभारली आहे.
पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवण्यासाठी हॉटेलने ग्राहकांकडून वाया घालविण्यात येणारे पाणी साठवण्यासाठी वॉश बेसिनखाली एक स्टीलची टाकी बसवलेली आहे. हॉटेलमधील खूपच तेलकट आणि अस्वच्छ असलेली भांडी घासायला अधिक पाणी खर्ची घालावे लागते. त्यामुळे टाकीत साठवलेल्या पाण्याचा पुनर्वापर हॉटेलमधील टेबल साफ करणे, झाडांना पाणी घालणे, भांडी धुणे, लादी पुसणे अशा इतर कामांसाठी केला जातो. या कल्पनेमुळे ग्राहकांच्या ग्लासमध्ये उरणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा वापर होत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिवसाला दीड ते दोन हजार लीटर पाण्याची बचत केली जात आहे. (प्रतिनिधी)