मोडी लिपीत अडकला वैभवशाली इतिहास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 06:37 AM2018-05-10T06:37:37+5:302018-05-10T06:37:37+5:30
महाराष्ट्रासह देशातील विविध सत्ता व शाह्यांच्या ८०० वर्षांचा लेखाजोखा मोडी लिपीमध्ये शब्दबद्ध झाला असून तो बाहेर काढण्यासाठी मोडी लिपीचे आकलन होणे गरजेचे आहे.
- दाजी कोळेकर
महाराष्ट्रासह देशातील विविध सत्ता व शाह्यांच्या ८०० वर्षांचा लेखाजोखा मोडी लिपीमध्ये शब्दबद्ध झाला असून तो बाहेर काढण्यासाठी मोडी लिपीचे आकलन होणे गरजेचे आहे. डिजिटलच्या जमान्यामध्ये हा खजिना बाहेर येणे धूसर वाटत असले तरी हा शेकडो वर्षांचा इतिहास मोडीतून देवनागरीमध्ये येणे गरजेचे आहे. जोपर्यंत मोडी समजणार नाही, तोपर्यंत हा शेकडो वर्षांचा इतिहास समजणार नाही. त्यासाठी इतिहासप्रेमी व अभ्यासकांसह सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
मोडी लिपी अवगत करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग, विविध वेबसाईट तसेच अॅपच्या माध्यमातून जास्तीत अभ्यासकांनी शिकण्याचा प्रयत्न करावा.
मोडीतील इतिहास बाहेर येतोय
१इतिहासाचा मागोवा घेणाऱ्या ‘मरहट्टी संशोधन व विकास मंडळ पुणे’ ही संशोधन संस्था अनेक मोडी कागदपत्रांचा शोध घेत आहे. या संस्थेच्या माध्यमातून सुरेश महारनवर, भूषणसिंह होळकर व सुमीत लोखंडे आदी अभ्यासक महाराष्टÑासह कर्नाटक, आंध्र प्रदेश व तेलंगणा राज्यात अभ्यासदौरे करून मराठेशाहीतील दुर्लक्षित सरदारांच्या पराक्रमी इतिहासाच्या मोडी कागदपत्रांचा धांडोळा घेत अनेक गढ्या व वाड्यावर जाऊन दप्तरे चाळत आहेत. या संशोधनातून मोडी अभ्यासक संतोष पिंगळे लिखित लवकरच मोडीत अडकलेल्या इतिहासावर एक पुस्तक येत आहे.
मोडी लिपी म्हणजे?
२मोडी मराठीची शीघ्र लिपी असून ती फक्त हस्तलिखितासाठी वापरली जात असे. या भाषेमध्ये कोट्यवधी कागदपत्रे असून ही मोडी म्हणजे एक अनमोल ऐतिहासिक ठेवा आहे. मराठी, गुजराती, हिंदी, संस्कृत या भाषा लिहिण्यासाठी मोडीचा वापर झालेला आहे. मुद्रण तंत्राच्या आगमनामुळे शेकडो वर्षांच्या अस्तित्वानंतर १९६० साली मोडी भाषा कालबाह्य ठरली. पण त्याच मोडी भाषेने मध्ययुगीन महाराष्टÑाचा वैभवशाली, गौरवशाली, प्रेरणादायी आणि समृद्ध इतिहास सामावून व सांभाळून ठेवला आहे.
इतिहासाचे वैभव जपणाºया मोडीचे जतन व्हावे
मोडी लिपीचा इतिहास
३मोडी लिपीच्या उगमाबद्दल एकमत नसून त्याबाबत वेगवेगळे मतप्रवाह मांडण्यात येत आहेत. पण महाराष्टÑात मोडी ८०० वर्षे वापरात असल्याचे समोर येत आहे. मोडीचा सर्वात जुना उपलब्ध लेख इ. स. ११८९ मधील आहे. या लिपीचे पुनर्जीवन प्रामुख्याने यादवकाळात झाले असून मोडीचे प्रामुख्याने सहा कालखंड पडतात.
आद्यकालीन मोडी :
ही शैली बाराव्या शतकापर्यंत होती.
यादवकालीन मोडी :
तेराव्या शतकाच्या कालखंडापर्यंत म्हणजे यादव साम्राज्याच्या अखेरच्या कालखंडात ही शैली अस्तित्वात होती.
बहामणीकालीन मोडी :
चौदाव्या ते सोळाव्या शतकाच्या कालावधीत ही शैली वापरली जात होती.
शिवकालीन :
छत्रपती शिवरायांच्या राज्यात मोडी लिपीला बहर आला. साधारणत: सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत याचे अस्तित्व होते.
पेशवेकालीन मोडी :
या काळात मोडीला आखीव, रेखीव सुटसुटीत स्वरूप प्राप्त झाले. हे लिखाण बोरूने होत असते.
आंग्लकालीन मोडी :
हा काळ म्हणजे ब्रिटिश अमलापासून ते स्वातंत्र्यानंतर महाराष्टÑ निर्मितीपर्यंतचा होय. या काळात मोडी पेनने लिहिली जाऊ लागली.
मोडीचे स्वरूप व व्याप्ती
च्मोडीमध्ये अनेक शब्दांची लघुरूपे वापरून कमीत कमी ओळीत सारांश लिहिला जात असे. प्रत्येक अक्षराची सुरुवात व शेवट डोक्यावरच्या रेषेवर होत. मोडी लिपी ही ब्राम्ही लिपीचाच एक प्रगत प्रकार असल्याचे सांगण्यात येत असून हात न उचलता लिहिणे, हे इतर लिपींपेक्षा वेगळेपण आहे. त्यामध्ये विविध वळणे प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये अनेक फेरबदल व सुधारणा होत गेल्या. इंग्लंड, फ्रान्स, पोर्तुगाल, डेन्मार्क आदी देशांसह भारतातील महाराष्टÑ, कर्नाटक, गोवा, गुजरात आदी विविध राज्यांमध्ये कोट्यवधी मोडी कागदपत्रे आहेत.
च्मोडीचा वापर यादवकाळापासून राज्य कारभार आणि प्रशासकीय लेखनात मोठ्या प्रमाणात सुरू झाला. पुढे शिवकाळ, पेशवाईत बहर आला आणि इंग्रजी राजवटीतही मोडी प्रचलित होती. या भाषेमध्ये विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचे दस्तऐवज ठेवले जात असत. ते पुढीलप्रमाणे : दफातेपत्र, इनामपत्र, वतनपत्र, रसानगी यादी, फेरिस्त, वकीलनामा, करारनामा, झडती, जाहीरनामा, तहनामा, आज्ञापत्र, अभयपत्र, मसाले चिठ्ठी, जमाबंदी, कबज वसूल, सरंजाम, जाबता, सनद, कतबा, हुजत, राजपत्र, अजमास व रोखा.
शेकडो वर्षांचा वैभवशाली इतिहास सामावलेल्या मोडीबाबत आजच्या तरुणाला विचारले तर असे सांगतात की, आमच्या घरी जुने दस्त मोडी लिपीत होते तसेच आमच्या आजोबांना ते वाचता येत असत. आणखी १०-२० वर्षांनी हे सुद्धा उत्तर मिळणार नाही आणि या लाखो करोडो कागदपत्रांमध्ये दडलेला इतिहास अज्ञात राहील. त्यामुळे या दस्तऐवजांचे वाचन होणे आवश्यक आहे. कारण त्यातील ८०० वर्षांचा इतिहास बाहेर येण्याची वाट पाहतोय. नाहीतर पुढील पिढीला आपण काय वारसा देणार? त्यासाठी सरकारने मोडी लिपीचा प्रचार, प्रसार होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करून मोडीतील प्रेरणादायी इतिहास भावी पिढीसमोर आणला पाहिजे.