"घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी", शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास, राजू शेट्टींनी व्यक्त केली भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:16 PM2023-08-21T12:16:12+5:302023-08-21T12:40:38+5:30

शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास पाहून चळवळीसाठी ३० वर्षे निस्वार्थपणे घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना व्यक्त केली आहे.

glorious journey of farmer's children, Raju Shetty expresses his sentiments | "घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी", शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास, राजू शेट्टींनी व्यक्त केली भावना

"घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी", शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास, राजू शेट्टींनी व्यक्त केली भावना

googlenewsNext

सोशल मीडियावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची एक पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी एका ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या मुलांचा दैदीप्यमान प्रवास पाहून चळवळीसाठी ३० वर्षे निस्वार्थपणे घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना व्यक्त केली आहे. दरम्यान, राजू शेट्टी दिल्ली येथे कामानिमित्त गेले असताना त्यांना एक फोन आला आणि आमच्या घरी जेवायला याल काय, असा प्रश्न एका तरुणाने केला. याला होकार देत राजू शेट्टी त्या तरुणाच्या घरी गुडगावला पोहोचले होते. यासंबंधीची पोस्ट राजू शेट्टी यांनी केली आहे.

राजू शेट्टी यांनी ट्विट म्हटले आहे की, "काही कामानिम्मीत्त तीन दिवसाचा दिल्ली दौरा करण्याचा योग आला. ही माहिती कळताच एका व्यक्तीचा मला फोन आला "साहेब, आपण माझ्या गुडगांव येथील घरी जेवायला येणार का ?" मी या निमंत्रणाला नाकारु शकलो नाही आणि त्याच्या विनंतीनुसार काल संध्याकाळी गुडगांव येथील पंचतारांकित डीएलएफ सोसायटीतील घरी गेलो. दारात सुंदर रांगोळी , फुलांचा सडा घालून केलेल्या औक्षणाने मन भारावून गेले. यानंतर आम्ही सर्वजण त्याच्या कुटुंबीयांसोबत भाकरी, खर्डा, दही असा गावराण बेत असलेल्या जेवणाचा आस्वाद घेतला. भरपेट जेवण आणि मनमोकळ्या संवादानंतर त्यांनी शाल व श्रीफळ देवून माझा कौटुंबिक सत्कार केला. या सत्कारावेळी त्यांनी माझ्या हातात 'लोकसभा 2024' साठी 25 हजार रूपयाचा धनादेश दिला."

याचबरोबर, पुढे पोस्टमध्ये राजू शेट्टी यांनी लिहले की,"हा सगळा पाहूणचार करणारी व्यक्ती म्हणजे 'अभिजीत पासाण्णा'. तो म्हणाला "साहेब आम्ही शिक्षण घेत असताना तुम्ही उसाच्या आंदोलनातून 700 रुपयांचा दर 3000 रुपयांवर आणला नसता तर माझ्या वडिलांना आम्हा भावंडांचे शिक्षण पूर्ण करता आले नसते आणि आज मी जिथं आहे तिथं स्वप्नात देखील पोहचू शकलो नसतो." अभिजीतचे आयआयटी चेन्नई मधून इंजिनीअरिंगचे पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण झाले, 8 वर्षे जनरल मोटर्स व पीएसए ग्रुप या कंपन्यांमध्ये नोकरी केली. गेल्या तीन वर्षापासून तो दिल्ली गुडगांव येथील डायको या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये इंजिनिअरींगचा विभागप्रमुख म्हणून काम करत आहे. त्याचा भाऊ अमेरिकेत ‘मर्सिडीझ बेन्झ’ कंपनीमध्ये कार्यरत आहे. एका सामान्य ऊस उत्पादकाच्या मुलांचा हा दैदीप्यमान प्रवास पाहून चळवळीसाठी 30 वर्षे निस्वार्थपणे घरावर तुळशीपत्र ठेवून खर्च केलेले तरुणपण सार्थकी झाल्याची भावना आज मनात दाटून आली."

दरम्यान, राजु शेट्टी यांची शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारा नेता म्हणून ओळख आहे. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सध्या काही कारणांनी चढ-उतार पाहायला मिळत आहे. मात्र, काही झाले तरी आपण शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढतच राहू अशी भूमिका राजू शेट्टी कायम घेताना दिसतात. 2002 साली उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस आंदोलन करण्यात आले. 1200 रुपये ऊस दर मिळावा या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात राजू शेट्टी जखमी झाले होते. हे आंदोलन यशस्वी झाले आणि राजू शेट्टी शेतकरी नेते म्हणून नावारूपाला आले. 
 

Web Title: glorious journey of farmer's children, Raju Shetty expresses his sentiments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.