‘आयआयएम’ला केंद्राचे ‘गो अहेड’
By admin | Published: January 8, 2015 01:25 AM2015-01-08T01:25:40+5:302015-01-08T01:25:40+5:30
देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे.
‘आयआयएम-अहमदाबाद’कडे पालकत्व : २०१५-१६ पासून सुरू होणार अभ्यासक्रम
नागपूर : देशातील सर्वोच्च पातळीवरील व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) नागपुरात स्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने हिरवी झेंडी दाखवली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात बुधवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना ही माहिती दिली. ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे ‘आयआयएम-नागपूर’चे पालकत्व देण्यात येणार आहे. २०१५-१६ या सत्रापासून येथे अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न राहणार आहेत.‘लोकमत’ने यासंदर्भात सुरुवातीपासून पाठपुरावा केला होता, हे विशेष.
दिल्लीमधील विज्ञान भवनात विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यावतीने निवड आधारित श्रेणी (क्रेडिट) व्यवस्था तसेच कौशल्य श्रेणी आधारित आराखडा याबाबत सर्व राज्यांच्या शिक्षणमंत्र्याची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी तावडे यांच्याशी चर्चा केली. नागपूरमध्ये ‘आयआयएम’ येणार असून, देशातील सर्वोत्तम ‘आयआयएम-अहमदाबाद’ हे नागपुरातील ‘आयआयएम’चे पालकत्व स्वीकारणार आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्यावतीने राज्यात ‘आयआयएम’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याकरिता मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या चार शहरांचा विचार करण्यात आला. मुंबई, पुणे या शहरांत जागेची वानवा असल्यामुळे औरंगाबाद आणि नागपूरमध्येच यासाठी खरी चुरस होती. यासंदर्भात विधिमंडळात दोन्ही विभागांच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी तावडे यांनी यासंदर्भात घोषणा केली. यासंदर्भातील प्रस्ताव केंद्र शासनाला पाठविण्यात आला होता.
केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर ‘आयआयएम’ स्थापन करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत. सर्वात अगोदर तर जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या चमूतर्फे लवकरच उपलब्ध जागेची तसेच तात्पुरत्या जागेची पाहणी करण्यात येईल.
‘व्हीएनआयटी’त होणार शुभारंभ?
नागपुरात मिहान येथील २०० एकर जागेचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता. तात्पुरते वर्ग सुरू करण्यासाठी ‘व्हीएनआयटी’नेदेखील चार एकर जागा व दोन इमारती देण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे कायमस्वरूपी जागा मिळेपर्यंत ‘व्हीएनआयटी’मध्ये २०१५-१६ पासून ‘आयआयएम’चे वर्ग सुरू होण्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.