ऊसतोड मजुराचा मुलगा अभ्यासासाठी जपानला जाणार

By admin | Published: May 11, 2017 12:14 AM2017-05-11T00:14:10+5:302017-05-11T00:18:31+5:30

सचिंद्र जाधवची दौऱ्यासाठी निवड : इन्स्पायर अवॉर्डमध्ये शेतीमित्र विज्ञान उपकरणाचा विजेता

Go to Japan for the study of the son of Ustad | ऊसतोड मजुराचा मुलगा अभ्यासासाठी जपानला जाणार

ऊसतोड मजुराचा मुलगा अभ्यासासाठी जपानला जाणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क --भोगावती : कौलव (ता. राधानगरी) येथील बाळासाहेब पाटील-कौलवकर हायस्कूल या प्रशालेतील विद्यार्थी सचिंद्र जाधव याची जपान अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील निवड झालेला यावर्षीचा सचिंद्र जाधव हा एकमेव विद्यार्थी आहे.
इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सचिंद्र जाधव याने राष्ट्रीय पातळीवर कांस्यपदक मिळविल्याने त्याला हा बहुमान मिळाला आहे. त्यानिमित्त आर्य समाज शिक्षण संस्थेमार्फत तनयाचा सत्कार आणि रोख पारितोषिक देण्यात आले. राज्यातून जपान दौऱ्यासाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली असून, सचिंद्र जाधव हा जिल्ह्यातील एकमेव विद्यार्थी आहे.
यावर्षीच्या इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात दहावीतील सचिंद्र जाधव याने शाळेतील विज्ञान शिक्षक आनंदराव चरापले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतीमित्र हे विज्ञान उपकरण तयार केले होते. या उपकरणाची निवड राष्ट्रीय पातळीवरील इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शन, पुसा नवी दिल्ली येथे झाली होती. तेथे त्याला तिसरा क्रमांक मिळाला. केंद्रीय विज्ञानमंत्री डॉ. हर्षवर्धन, संशोधक डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. कांस्यपदक, प्रशस्तिपत्र आणि लॅपटॉप असे पारितोषिक त्याला मिळाले. आता त्याची जपान अभ्यास सहलीसाठी निवड झाली.
सचिंद्र जाधव हा पिंपळवाडी गावातील भोगावती साखर कारखान्याकडे असलेल्या ऊस तोडणी मजुराचा मुलगा आहे. त्याची आर्थिक परिस्थिती गरिबीची आहे. त्याने मिळविलेले विज्ञानातील यश हे उल्लेखनीय आहे. या यशाबद्दल सचिंद्र जाधव आणि बाळासाहेब पाटील-कौलवकर हायस्कूलचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जपान अभ्यास दौरा सत्तावीस मे ते सहा जूनपर्यंत असून, जपान देशातील विज्ञानातील महत्त्वाच्या संस्थांना भेटी देणार आहेत. विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली जपान दौरा होत आहे. यानिमित्त सचिंद्र जाधव याचा कोल्हापूर आर्य समाज शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीपसिंह पाटील-कौलवकर यांच्या हस्ते सत्कार आणि रोख पाच हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एस. वाय. पाटील आणि शिक्षक उपस्थित होते.


दहा वर्षांत जिल्ह्यातील
तिघांची निवड
महाराष्ट्र इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात राष्ट्रीय पातळीवर गेल्या दहा वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील फक्त तीनच विद्यार्थी चमकले आहेत. त्यामध्ये नितीन पाटील (आरळे), यश आंबोळे (कोल्हापूर), सचिंद्र जाधव (कौलव) यांचा समावेश आहे.
पिंपळवाडीसारख्या दुर्गम भागातील विद्यार्थ्याचे विज्ञान प्रदर्शनातील यश कौतुकास्पद आहे.


बाळासाहेब पाटील हायस्कूलचा विद्यार्थी सचिंद्र जाधव याची जपानला अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना अध्यक्ष दिलीप पाटील-कौलवकर, सदाशिव पाटील, आनंदराव चरापले उपस्थित होते.

Web Title: Go to Japan for the study of the son of Ustad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.