मुंबईच्या गोपिका पंजाबला जाणार

By admin | Published: August 29, 2015 01:45 AM2015-08-29T01:45:05+5:302015-08-29T01:45:05+5:30

मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही

Go to Mumbai's Gopika, Punjab | मुंबईच्या गोपिका पंजाबला जाणार

मुंबईच्या गोपिका पंजाबला जाणार

Next

मुंबई : मुंबईतील पल्लवी फाउंडेशनचे गोरखनाथ महिला दहीहंडी मंडळातील १८० महिलांचे पथक दहीहंडी फोडण्यासाठी पंजाबला रवाना होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारचे मानधन नसताना केवळ महाराष्ट्राची संस्कृती देशभर पोहोचवण्यासाठी या महिला पंजाबला जात आहेत, असे मंडळाच्या अध्यक्षा शलाका कोरगांवकर यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरगांवकर म्हणाल्या, महाराष्ट्र शीख असोसिएशनने पंजाबमधील अमृतसरमध्ये दहीहंडीचे आयोजन केले आहे. महिलांचा येण्याजाण्याचा खर्च मंडळाने केला असून, आयोजकांनी तेथील सर्व व्यवस्था केली आहे. याआधी हे पथक द्वारका, डाकोर, उडप्पी, मथुरा, कर्नाटक (निप्पाणी), जयपूर, उजैन, वाराणसीला जाऊन आले आहे. अलीकडेच घुमान येथे पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर महिला पथकाला दहीहंडी फोडण्याचे निमंत्रण मिळाल्याने महिलाही जाण्यासाठी उत्सुक आहेत. २ सप्टेंबरला ट्रेनने पंजाबला जाणार असून, ५ सप्टेंबरच्या मध्यरात्री गोकुळाष्टमीला महिला एक हंडी आणि दुसऱ्या रात्री दोन हंड्या फोडणार असल्याचे कोरगांवकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र शीख असोसिएशनचे अध्यक्ष दलजित सिंग बल यांनी सांगितले की, मुंबईप्रमाणे पंजाबमध्ये दहीहंडी उत्सव साजरा केला जात नाही. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रीय आणि पंजाबी लोकांमध्ये आपुलकीची भावना अधिक बळकट झाली आहे. त्यात अधिक भर टाकण्यासाठी हा उत्सव पंजाबमध्ये साजरा करण्याचा प्रयत्न आहे.

महिला पथक दहीहंडी उत्सवासाठी पंजाबमध्ये येणार असल्याचे कळताच दिल्ली गुरूद्वारा मॅनेजमेंट कमिटीनेही पंजाबमधील ८० खोल्यांची इमारत मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिली आहे. महिलांच्या जेवणाचा खर्चही कमिटीने करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय तळमळतेने गोकुळाष्टमीची वाट पाहणाऱ्यांनी उत्सवाठिकाणीच आठवडाभर गीता प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला आहे.

मंडळांनी स्वत:वर निर्बंध घालावे
सार्वजनिक गोविंदा पथकांनी स्वत:वर निर्बंध घातल्यास न्यायालयाला निर्बंध घालण्याची गरज भासणार नाही, असेही शलाका कोरगांवकर म्हणाल्या. उत्सवाला अर्थकारणाचा संदर्भ लागल्याने उत्सवाचे रूप बदलले आहे. न्यायालयाने उत्सव साजरू करू नये, असे कुठेही म्हटलेले नाही. केवळ उत्सवातील अर्थकारण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे चुकीचा अर्थ न काढता मंडळानी उत्सव साजरा करण्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Web Title: Go to Mumbai's Gopika, Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.