जाता पंढरीसी... अमुचा राम राम घ्यावा
By admin | Published: June 28, 2017 11:19 PM2017-06-28T23:19:40+5:302017-06-28T23:19:40+5:30
जाता पंढरीसी... अमुचा राम राम घ्यावा
!लोकमत न्यूज नेटवर्क
वाठार निंबाळकर : सातारा जिल्ह्यातील चार दिवसांचा मुक्काम आटोपून व बरड (ता. फलटण) ग्रामस्थांचा सत्कार स्वीकारून श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याने बुधवारी (दि. २८) सकाळी ‘माउली-माउली’च्या जयघोषात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. पंढरीकडे मार्गस्थ झालेल्या माउलींच्या पालखीला जिल्ह्यातील हजारो भाविकांनी निरोप दिला.
बरड येथील शेवटचा मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी आरती, अभिषेक व इतर विधी पार पडल्यानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ झाला. राजुरी येथे सातारा जिल्हा व फलटण तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार, उपजिल्हाधिकारी प्रमोद यादव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील, उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, राजुरीच्या सरपंच कौशल्या साळुंखे, उपसरपंच भारत गावडे यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत पालखीला निरोप देण्यात आला.
सोहळा सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताच याठिकाणी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार हणमंतराव डोळस, आमदार रामहरी रुपनवर, जिल्हा परिषद अध्यक्ष संजयमामा शिंदे, माळशिरस सभापती वैष्णवीदेवी मोहिते-पाटील, उपसभापती किशोर सुळ, सोलापूरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारूड, पोलिस अधीक्षक विरेश प्रभु यांच्यासह ग्रामस्थांच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी प्रथमच या स्वागत सोहळ्याला हजेरी लावली. तर माजी मंत्री बबनराव पाचपुते वारीत सहभागी झाले. पालखी सोहळा निर्वीघ्नपणे पार पडल्याबद्दल जिल्हाधिकारी श्वेता सिंघल व जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील यांनी विविध विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.