सत्तेसोबत जा; पण माणुसकी ठेवा! शरद पवारांचा फुटीर नेत्यांना इशारा; बीड सभेला लक्षणीय गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 05:57 AM2023-08-18T05:57:11+5:302023-08-18T05:57:24+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाच शरद पवार यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

go with the power but keep humanity sharad pawar warning to separatist leaders | सत्तेसोबत जा; पण माणुसकी ठेवा! शरद पवारांचा फुटीर नेत्यांना इशारा; बीड सभेला लक्षणीय गर्दी

सत्तेसोबत जा; पण माणुसकी ठेवा! शरद पवारांचा फुटीर नेत्यांना इशारा; बीड सभेला लक्षणीय गर्दी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : माझ्या वयाचा उल्लेख करून काही जण आमच्या आमदारांना सत्तेच्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न करत आहेत. माझे वय झाले असेलही; परंतु तुम्ही माझे काय पाहिले? असा सवाल करत, सत्तेच्या बाजूला जा; पण थोडी माणुसकी ठेवा, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्याच पक्षाच्या फुटीर नेत्यांना दिला. 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर खासदार पवार यांची बीड येथे मराठवाड्यातील ही पहिलीच सभा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतानाच खा. पवार यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, सत्तेत सामील झालेल्या काही आमदारांकडे आम्ही चौकशी केली असता, शरद पवार यांच्याकडे कशाला जाता, त्यांचे वय झाले आहे, असे सांगितले जात असल्याचे समजले. जरूर माझे वय झाले असेल;  पण तुम्ही माझे काय पाहिले? सत्तेच्या बाजूला जा; पण ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल, तर त्यांच्याबाबत थोडी माणुसकी ठेवा, नाही तर लोक धडा शिकवतील. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचा पराभव करून तुम्ही निवडून आलात आणि आज त्यांच्याच दावणीला जाऊन बसलात; पण भविष्यात मतदान केंद्रावर गेल्यावर मतदारच कोणते बटन दाबून तुम्हाला कोठे पाठवायचे हे ठरवतील, असा गर्भित इशाराही खा. पवार यांनी दिला.

मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत, राज्य जळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर चकार शब्द काढायला तयार नाहीत. ठाण्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यूचे तांडव सुरू आहे; पण सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची टीकाही त्यांनी केली. 

त्यांचेही असेच होईल...

स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले ‘मी पुन्हा येईन.’ असाच डायलॉग यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना मारला होता. ते पुन्हा आले; पण मुख्यमंत्री न होता उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे मोदींचेही असेच होईल, असा टोला पवार यांनी लगावला.

धनंजय मुंडेंना विरोधक भेटला

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातील कार्यकर्ते बबन गिते यांनी आपल्या समर्थकांसह शरद पवार यांच्या गटात प्रवेश केला. त्यासाठी त्यांनी जवळपास चार-पाचशे गाड्यांचा ताफा आणला होता. गिते यांच्या माध्यमातून थोरल्या पवारांनी धनंजय मुंडे यांना प्रतिस्पर्धी शोधला असल्याची चर्चा सभास्थळी होती.

शरद पवारांच्या टीकेवर मुंडे यांचे मौन

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी बीडच्या सभेत जिल्ह्यातील नेते आणि अजित पवारांबरोबर गेलेले धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. शरद पवारांनी केलेल्या टीकेबाबत धनंजय मुंडे यांना विचारले असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला, पवारांच्या बोलण्याचा काहीही अर्थ काढा, एवढेच मुंडे या टीकेबाबत विचारले असता म्हणाले.

माझे वय झाले असेल;  पण तुम्ही माझे काय पाहिले? सत्तेच्या बाजूला जा; पण ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले असेल, तर त्यांच्याबाबत थोडी माणुसकी ठेवा, नाही तर लोक धडा शिकवतील.

 

Web Title: go with the power but keep humanity sharad pawar warning to separatist leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.