हा 'फिक्सर' बनवणार मनोहर पर्रीकरांना गोव्याचा मुख्यमंत्री
By admin | Published: March 14, 2017 11:53 AM2017-03-14T11:53:07+5:302017-03-14T11:57:04+5:30
गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झालेल्या मनोहर पर्रीकर यांनी फिक्सर म्हणत ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त टीका केली होती त्याच व्यक्तीने त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 14 - गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी सज्ज झालेल्या मनोहर पर्रीकर यांनी फिक्सर म्हणत ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त टीका केली होती त्याच व्यक्तीने त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा केला आहे. विधानसभा निवडणुकीवेळी मनोहर पर्रीकर यांनी जाहीरपणे गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांच्यावर फिक्सर म्हणून टीका केली होती. विशेष म्हणजे विजय सरदेसाई यांनी मनोहर पर्रीकरांना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवरच भाजपाला समर्थन देण्याची संमती दर्शवली.
गोव्यात भाजपाचं सरकार स्थापन होण्याची तयारी सुरु झाली आहे. विजय सरदेसाई यांनी दिलेल्या समर्थनाच्या जोरावर 40 सदस्यांच्या विधानसभेत 21 सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मुख्य म्हणजे काँग्रेसने सर्वात जास्त जागा जिंकल्या असतानाही भाजपाने खेळी करत सत्तेचा मार्ग मोकळा केला आहे.
तीन सदस्य असणा-या गोवा फॉरवर्ड पार्टीचं समर्थन मिळाल्यासोबतच भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला. गोवा फॉरवर्ड पार्टी, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि एनसीपीच्या एकमेव आमदाराच्या समर्थनासोबत सत्तास्थापनेसाठी गरज असलेला आकडा भाजपाने गाठला आहे. काँग्रस 17 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता. पण काँग्रेस विरोधी पक्षनेता ठरवण्यात व्यस्त असताना भाजपाने चकवा देत सर्व बाजी पलटली आहे.
नुकताच गोवा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत बहुमतांसाठी 21 सदस्यांची आवश्यकता आहे. भाजपाचे 13 आमदार निवडून आले. काँग्रेसचे संख्याबळ 17 आहे. असे असतानाही भाजपाने छोटया पक्षांना आणि अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मनोहर पर्रिकरांनी राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याजवळ आमदारांची ओळख परेडही केली. मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात नव्या सरकारचा शपथविधी मंगळवारी, सायंकाळी सव्वापाच वाजता काबो येथील राजनिवासावर होणार आहे.
पर्रीकर चौथ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. मुख्यमंत्र्यांसह एकूण नऊ मंत्र्यांचा मंगळवारी शपथविधी होणार आहे. तथापि, भाजपाकडे केवळ १३ आमदार असताना राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी सरकार स्थापन करण्यासाठी भाजपाला निमंत्रित केल्यामुळे गोवा सुरक्षा मंच पक्षाने राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे. भाजपाप्रणीत आघाडीकडे गोवा फॉरवर्ड, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष आणि अपक्ष तीन मिळून एकूण २२ आमदारांचे संख्याबळ आहे.
पर्रीकर २००० साली प्रथम मुख्यमंत्री बनले होते. यापूर्वी तीनवेळा मुख्यमंत्री बनलेल्या पर्रीकर यांनी एकदाही मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला नाही. आता चौथ्यांदा पर्रीकर मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत मंत्री म्हणून मगोपचे सुदिन ढवळीकर व बाबू आजगावकर, गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई, जयेश साळगावकर आणि अपक्ष रोहन खंवटे व अपक्ष आमदार गोविंद गावडे यांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. या शिवाय भाजपाच्या दोघा आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली जाईल. मुख्यमंत्र्यांसह एकूण बाराजणांना मंत्री करता येते. नऊजणांना शपथ देऊन मंत्रिमंडळातील तीन पदे तूर्त रिकामी ठेवली जाणार आहेत. सरदेसाई, खंवटे, गावडे, साळगावकर हे प्रथमच मंत्री बनत आहेत.