गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले गुरुमाउलीचे दर्शन
By Admin | Published: January 19, 2015 02:27 AM2015-01-19T02:27:51+5:302015-01-19T02:27:51+5:30
गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी कारंजा येथील सुप्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरुमाउलीचे दर्शन घेतले.
कारंजा लाड (वाशिम) : गोवा राज्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी त्यांच्या पत्नी स्मिता पारसेकर व मुलासह कारंजा येथील सुप्रसिद्ध श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (गुरुमंदिर) येथे सुरू असलेल्या ४५ दिवशीय जन्मोत्सवात उपस्थित होऊन १८ जानेवारी रोजी सकाळी गुरुमाउलीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर हे आपल्या कुटुंबीयासह रेल्वेने सकाळी ६ वाजता मूर्तिजापूर येथे पोहोचले व कारने कारंजा येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात अल्पवेळ विश्रांतीनंतर सकाळी ९:३0 वाजता गुरुमंदिरात दर्शनासाठी आले व आशीर्वाद घेतल्यानंतर महाराजाच्या जन्मस्थळाला भेट दिली. कारंजा येथील वास्तव्यात त्यांच्या हस्ते अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या विदर्भ प्रांत बैठकीचे उद्घाटन करण्यात आले तसेच पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमात त्यांनी बुथवर जाऊन बालकांना पोलिओचा डोस पाजला. माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा यांच्या निवासस्थानी त्यांनी सदिच्छा भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री पारसेकर शेगावकडे रवाना झाले. यावेळी जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी, जिल्हा पुरवठा अधिकारी मिस्किन, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव देशमुख, उपविभागीय महसूल अधिकारी दिनकर काळे, तहसीलदार श्रीकांत उंबरकर, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, नागरिक आदी उपस्थित होते.