गोवा : सुझान खानविरोधातील 'तो' गुन्हा रद्द
By Admin | Published: August 25, 2016 01:28 PM2016-08-25T13:28:30+5:302016-08-25T13:28:30+5:30
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची घटस्फोटित पत्नी सुझान खान हिच्याविरुध्द गोवा पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द ठरवला आहे.
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २५ - बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन याची घटस्फोटित पत्नी सुझान खान हिच्याविरुध्द शहर पोलिसांनी १ कोटी ८७ लाख रुपये फसवणूक प्रकरणात नोंदविलेला गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्दबातल ठरविला आहे.
या निवाड्यानंतर सुझान हिने याची माहिती व्टीटरवर देताना न्यायमंडळाचे आभार मानले आहेत.आपल्याविरुध्दचे गुन्हे कोर्टाने रद्दबातल ठरविले त्यामुळे आपण आरोपमुक्त झाले आहे, असे तिने म्हटले आहे.
भादंसंच्या कलम ४२0 खाली पोलिसांनी तिच्याविरुध्द हा गुन्हा नोंदविला होता. डिझायनर असलेल्या ३७ वर्षीय सुझान हिने त्यास हायकोर्टात आव्हान दिले होते.
स्वत: आर्किटेक्ट असल्याचे भासवून २0१३ साली तिने एका प्रकल्पासाठी ‘आर्किटेक्चरल अॅण्ड डिझायनिंग सर्व्हिसेस’चे कंत्राट मिळविले आणि फसवणूक केल्याचा आरोप तिच्याविरुध्द होता. एमजी प्रॉपर्टीज या रीयल इस्टेट आस्थापनाचे व्यवस्थापकीय भागिदार मोहित गुप्ता यांनी यासंबंधी पोलिस स्थानकात तक्रार केली होती. तिने वेळेत काम पूर्ण केले आणि आणि जे काम केले ते निकृष्ट दर्जाचे होते, असेही तक्रारीत म्हटले होते. आर्किटेक्चर मंडळाकडेही सुझान हिची नोंदणी नसल्याचे आढळून आले.
सुझान हीच्या मालकीच्या काही कंपन्या आहेत. अंतर्गत सजावट तसेच डिझाइन कौशल्य याच्याशी या कंपन्या निगडित आहेत.
या प्रकरणी आधी पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ चालवली होती परंतु तक्रारदार एमजी प्रॉपर्टीजने न्यायालयात धांव घेतल्यानंतर तिच्याविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला.