गोवा राष्ट्रीय महामार्ग खड्डेमुक्त होण्याची शक्यता धूसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2016 06:03 AM2016-08-30T06:03:13+5:302016-08-30T06:03:13+5:30
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून तो ३० आॅगस्टपूर्वी वाहतुकीस बिनधोक होण्याच्या सर्व शक्यता धूसर झाल्याने, या महामार्गावरील वडखळ, वाकण, सुकेळी खिंड, माणगाव
जयंत धुळप, अलिबाग
गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवून तो ३० आॅगस्टपूर्वी वाहतुकीस बिनधोक होण्याच्या सर्व शक्यता धूसर झाल्याने, या महामार्गावरील वडखळ, वाकण, सुकेळी खिंड, माणगाव आणि नाते खिंड(महाड) येथे दरवर्षीप्रमाणे वाहतूककोंडी होऊन कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेशभक्तांचे हाल न होण्याकरिता गोवा महामार्गाच्या या टप्प्यासाठी रायगड जिल्हा पोलिसांनी चार पर्यायी मार्ग उपलब्ध करून दिले. महामार्गावरील वाहतूकच कमी करण्याचे नियोजन केले असल्याची माहिती रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो. सुवेझ हक यांनी सोमवारी संध्याकाळी दिली आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोणत्याही परिस्थितीत वाहतूककोंडी न होण्यासाठी रायगड पोलिसांच्या माध्यमातून प्रभावी बंदोबस्त नियोजन करण्यात आले आहे. ५ पोलीस उप अधीक्षक, १३ पोलीस निरीक्षक, ३४ पोलीस उप निरीक्षक अशा एकूण ५२ पोलीस अधिकाऱ्यांसह ४२८ पोलीस, १८ पोलीस जीप, २० मोटरसायकलीस्ट पोलीस, ५४ वॉकीटॉकी अशी फौज १ सप्टेंबरपासून २४ तास तैनात करण्यात येणार आहे.
गोवा राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ मार्ग काढण्याकरिता महामार्गाच्या रायगड जिल्हा टप्प्यात चार क्रेन, चार जेसीबी, चार रुग्णवाहिका, ५५ सीसीटीव्ही कॅमेरे या सह हमरापूर, कांदळेपाडा, वाकण फाटा, नातेखिंड येथे पोलीस मदत केंद्रे उभारण्यात येत आहेत.
रायगड जिल्ह्यात २७६ सार्वजनिक तर ९९ हजार ७६२ खाजगी गणपती तर १४ हजार ६४७ गौरींची स्थापना होणार असून जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, सात उप विभागीय पोलीस अधिकारी, २७ पोलीस निरीक्षक, १४४ पोलीस उप निरीक्षक व १९०० पोलीस तैनात करण्यात आले. पर जिल्ह्यातील ४०० पोलीस, ४०० होमगार्ड व एसआरपीची एक कंपनी रायगड जिल्ह्यास उपलब्ध होणार असल्याचे हक यांनी सांगितले.