गोव्यात ज्या हॉटेलमध्ये बंडखोर आमदार होते तिथून राष्ट्रवादीच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक; सेना आमदारांशी संपर्क?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 10:15 AM2022-07-03T10:15:11+5:302022-07-03T10:16:50+5:30
शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते त्याच हॉटेलमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे तिघंही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई-
शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यातील ज्या हॉटेलमध्ये वास्तव्याला होते त्याच हॉटेलमधून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हे तिघंही राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असल्याची माहिती समोर आली आहे. बनावट ओळखपत्र तयार करुन तिघांनी हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. हॉटेलच्या तक्रारीनंतर पणजी पोलिसांनी या तीन जणांना अटक केली आहे. तिघांनी शिवसेना बंडखोर आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.
शिंदे गटातील आमदार शनिवारी रात्री मुंबईत परतले. गुवाहाटीमधून या आमदारांना गोव्यातील पंचतारांकीत हॉटेलमध्ये नेण्यात आलं होतं. या हॉटेलमध्ये आमदारांशी संपर्क साधण्याच्या हेतूनं तीन जणांनी बनावट ओळखपत्राच्या सहाय्यानं हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया दुहान आणि त्यांच्यासह आणखी दोन कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तिघांनाही शनिवारी दुपारी पणजी पोलिसांनी अटक केली आहे. बनावट ओळखपत्र दाखवून प्रवेश केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
सोनिया दुहान या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत. २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे शपथविधी घेऊन महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही आमदारांना गुरुग्राम येथील हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी या आमदारांची सुटका करण्यासाठी सोनिया दुहान यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. राष्ट्रवादीच्या आमदारांची सुखरुप सुटका करण्याची जबाबदारी सोनिया दुहान आणि कार्यकर्त्यांनी समर्थपणे पार पाडली होती.