मुंबई क्रिकेटचा विस्तार हेच ध्येय
By admin | Published: June 14, 2015 01:50 AM2015-06-14T01:50:55+5:302015-06-14T01:50:55+5:30
क्रिकेटकडे पाहायचा आमचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा असून मुंबई क्रिकेटचा स्तर आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही राहिल.
मुंबई : क्रिकेटकडे पाहायचा आमचा दृष्टीकोन अत्यंत वेगळा असून मुंबई क्रिकेटचा स्तर आणखी वाढवण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही राहिल. आपण सर्व मिळून मुंबई क्रिकेटमध्ये मोठे योगदान देऊ, असा विश्वास मुंबई क्रिकेट असोसिएशनची (एमसीए) अध्यक्षपदाची निवडणूक लढवित असलेले शरद पवार यांनी केले
शनिवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व एमसीएतील सत्ताधारी पवार - म्हाडदळकर गटाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या गटाची भूमिका मांडली. उमेदवारांची माहिती देताना प्रत्येकावर देण्यात आलेल्या जबाबदारींची देखील माहिती त्यांनी यावेळी दिली.
मी अणि उपाध्यध्यक्षपदासाठी उभे असलेले आमदार आशीष शेलार हे खेळाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या उपक्रमांवर निर्णय घेतील. राज्य सरकारकडून आवश्यक त्या परवानगी घेण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू. त्याचवेळी खेळाडू व त्यांच्या समस्या याबाबत माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर व इतर सदस्य निर्णय घेतील. यामुळेच आमचा गट समतोल असून मुंबई क्रिकेटच्या अधिक विस्तारासाठी आम्ही सज्ज आहोत, असे पवार म्हणाले.
एकूणच, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर झालेल्या या पहिल्या कार्यक्रमातून पवार - म्हाडदळकर गटाने जोमाने ‘बोलंदाजी’ करून निवडणुकीमध्ये विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त केला. (क्रीडा प्रतिनिधी)
अध्यक्षपदासाठीचे प्रतिस्पर्धी क्रिकेट फर्स्ट गटाचे ‘कर्णधार’ विजय पाटील यांच्यावर देखील पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, डीवाय पाटील स्टेडियमवर एमसीए आंतरराष्ट्रीय सामने होऊ देत नाही, असे पाटील यांचे म्हणणे आहे. पण याबाबत मी सांगू इच्छितो की, आंतरराष्ट्रीय सामने आयोजनासाठी बीसीसीआय सोबतच आयसीसीची मान्यता असणे आवश्यक असते. अशी मान्यता केवळ वानखेडे व सीसीआयला असताना, हे सामने डीवायवर कसे खेळवता येतील, असा सवाल पवार यांनी केला.
मुंबई क्रिकेटमध्ये शालेय व कॉलेजस्तरचे क्रिकेट अत्यंत महत्त्वाचे असून त्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. मैदानावरच्या सुविधांवर देखील लक्ष देणे गरजेचे आहे. पवार - म्हाडदळकर गट यासाठीच आतापर्यत कार्य केले आहे.
- दिलीप वेंगसरकर, माजी कसोटीपटू