‘देवा’ विरुद्ध ‘टायगर जिंदा है’ : मल्टिप्लेक्सविरुद्ध मनसे आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 03:49 AM2017-12-21T03:49:35+5:302017-12-21T03:50:00+5:30
मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी मराठी विरुद्ध हिंदी वाद मुंबईत पुन्हा पेटताना दिसत आहे. येत्या शुक्रवारी (दि.२२) ‘देवा’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर यशराजचा ‘टायगर जिंदा है’देखील धडकतोय. या वेळी ‘टायगर जिंदा है’साठी मल्टिप्लेक्सने प्राइम टाइम दिल्याने ‘देवा’लाही प्राइम टाइम द्या, अशी मागणी मनसेने लावून धरली आहे.
मुंबई : मल्टिप्लेक्समधील प्राइम टाइम मिळावा, यासाठी मराठी विरुद्ध हिंदी वाद मुंबईत पुन्हा पेटताना दिसत आहे. येत्या शुक्रवारी (दि.२२) ‘देवा’ हा मराठी चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. तर यशराजचा ‘टायगर जिंदा है’देखील धडकतोय. या वेळी ‘टायगर जिंदा है’साठी मल्टिप्लेक्सने प्राइम टाइम दिल्याने ‘देवा’लाही प्राइम टाइम द्या, अशी मागणी मनसेने लावून धरली आहे.
‘देवा’देखील धुमधडाक्यात प्रदर्शित करण्याचा आम्ही ठाम निर्धार केला आहे; परंतु यदाकदाचित तसे झाले नाही, तर यशराज फिल्म्सच्या शूटिंग महाराष्ट्रात होत असतात, हे त्यांनी लक्षात ठेवावे. मल्टिप्लेक्स व सिंगल स्क्रीन थिएटर्सनीही आम्हाला कायदा हातात घ्यायला लावू नये, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
२२ डिसेंबर रोजी यशराज फिल्म्सचा अभिनेता सलमान खानची भूमिका असलेला ‘टायगर जिंदा है’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. याच दिवशी ‘देवा’ हा मराठी चित्रपटही प्रदर्शित होत आहे. मात्र, ‘देवा’ला प्रदर्शनासाठी स्क्रीन्स उपलब्ध होत नसल्याने वातावरण तापत चालले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे.
मराठी चित्रपटांना महाराष्ट्रात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी मल्टिप्लेक्सवाल्यांकडे भीक मागावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे. हिंदी चित्रपटांकडून थिएटर मालकांकडे स्क्रीन्स मिळविण्यासाठी दादागिरी केली जात आहे. महाराष्ट्रात हा माज वास्तविक मराठी चित्रपटांनी करायला हवा. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांसाठी आंदोलने करावी लागतात हे दुर्दैव आहे. ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटाला आमचा विरोध नाही, तर यशराज फिल्म्सच्या मुजोरपणाला, दादागिरीला विरोध आहे. आम्ही त्यांना याबाबत एक पत्र पाठवले आहे. त्यांच्याकडून उत्तर अपेक्षित आहे, असेही अमेय खोपकर यांनी याविषयी बोलताना स्पष्ट केले.
दरम्यान, ‘देवा’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता अंकुश चौधरीने, ‘आम्हाला वाद नकोत; ‘टायगर जिंदा है’ चित्रपट पण चालू दे आणि माझा ‘देवा’ पण चालू दे एवढीच आमची इच्छा आहे,’ अशी भूमिका या एकूणच प्रकरणावर मांडली आहे.
अवस्था फेरीवाल्यांसारखी - राऊत
‘देवा’ विरुद्ध ‘टायगर जिंदा है’वाद पेटत असताना, त्यात आता शिवसेनेदेखील उडी घेतली आहे. ‘देवा’च काय प्रत्येक मराठी चित्रपटाला थिएटर मिळायला हवे. मराठी निर्मात्यांची अवस्था फेरीवाल्यांसारखी झाली आहे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
कारवाई का नाही?
महाराष्टÑ सरकारने मल्टिप्लेक्सना मराठी चित्रपटांच्या स्क्रीनिंगचे आदेश दिले असतानाही थिएटर मालक आदेशाचे उल्लंघन करतात. आदेश असतानाही मराठी चित्रपटांना मल्टिप्लेक्स नाकारणाºया थिएटर्सवर कारवाई का होत नाही?
- नाना पाटेकर, ज्येष्ठ अभिनेते
स्वाभिमान पाहिजेच!
महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटांचा स्वाभिमान राखलाच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ‘देवा’ला मारून ‘टायगर जिंदा’ राहत असेल, तर थिएटर्सना कुठलाच ‘टायगर’ वाचवू शकणार नाही!
- नीतेश राणे, आमदार