देवालाही गंडवतात!
By Admin | Published: March 8, 2015 01:57 AM2015-03-08T01:57:52+5:302015-03-08T01:57:52+5:30
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे विठ्ठलाला नवस बोलतो...‘मी निवडणूक जिंकलो, आमदार बनलो की, देवा तुला सोन्याची टोपी देईन.’
मंदिर विश्वस्त हैराण : नवस फेडण्यासाठी नकली चांदीच्या वस्तूंचे दान
प्रशांत तेलवाडकर - औरंगाबाद
‘गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा’ या चित्रपटात अभिनेता मकरंद अनासपुरे विठ्ठलाला नवस बोलतो...‘मी निवडणूक जिंकलो, आमदार बनलो की, देवा तुला सोन्याची टोपी देईन.’ निवडून आल्यावर तो मंदिरात जातो आणि सोन्या नावाच्या मुलाच्या डोक्यावरील कापडी टोपी काढून देवाच्या डोक्यावर ठेवतो... हा झाला चित्रपटातील विनोद... पण देवाला अशा ‘टोप्या’ वास्तवातही घातल्या जातात. नकली चांदी अर्पण करून देवालाच फसविणाऱ्या प्रकारांमुळे औरंगाबादेतील काही मंदिरांचे विश्वस्त हैराण झाले आहेत.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक वेरूळ येथील घृष्णेश्वर मंदिरात भाविक नवसापोटी चांदीचे बेल, त्रिशूळ आणून देतात. काही महिन्यांपूर्वी या वस्तूंचे परीक्षण करण्यात आले. त्यात सुमारे किलोभर चांदी नकली असल्याचे सोनाराने सांगितले. शहराचे आराध्य दैवत संस्थान गणपती. त्यालाही भाविकांनी सोडलेले नाही. भाविक नवसफेडीसाठी चांदीच्या दुर्वा, मोदक आणून येथे देतात. मंदिराच्या विश्वस्तांनी या चांदीच्या वस्तू गाळून त्याची देवाच्या डोक्यावर छत्री तयार करण्याचा निर्णय घेतला. मात्र, जमा झालेल्या चांदीत नकली चांदीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. असाच अनुभव सिडको एन-१ येथील भक्ती गणेश मंदिर, दिवाण देवडी येथील पावन गणेश मंदिरातील विश्वस्तांना आला.
घृष्णेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संजय वैद्य यांनी सांगितले की, नवस फेडताना लोक मंदिरात चांदीच्या वस्तू आणून देतात. त्याची भाविकांना रीतसर पावती दिली जाते. चांदीच्या वस्तूंचे आॅडिट पंचांसमोर होत असते. तिथे कोणी तज्ज्ञ नसतो. या वस्तूंची नोंद झाल्यानंतर सर्वांच्या त्यावर सह्या होतात. जेव्हा सोनाराला बोलवून चांदीची तपासणी केली जाते, त्यात ६० टक्के वस्तू नकली चांदीच्या असल्याचे आढळून येते. मात्र, पंच यावर विश्वास ठेवत नाहीत. अशा वेळी विश्वस्तांकडे संशयाच्या नजरेने बघितले जाते, अशी व्यथा गणपती ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त प्रफुल्ल मालानी यांनी मांडली.
फसवणूक टाळण्यासाठी...
ही फसवणूक टाळण्यासाठी व्यापाऱ्यांनी नवसाची चांदी देताना ग्राहकांना नकली व असली चांदीमधील फरक सांगून वस्तू विक्री करावी व ग्राहकांनी चोखंदळपणे चांदीच्या वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन सराफा व्यापारी जुगलकिशोर वर्मा यांनी केले.
‘झीरो टन’ चांदी म्हणजे काय? : जर्मन सिल्व्हर या प्रकाराला व्यापारी भाषेत ‘झीरो टन’ चांदी म्हणतात. जर्मन सिल्व्हरच्या वस्तूवर चांदीचा मुुलामा चढवून त्यास पॉलिश दिले जाते. याच वस्तूला झीरो टन (नकली चांदी) म्हणतात. उल्लेखनीय म्हणजे, शुद्ध चांदीपेक्षा नकली चांदी जास्त आकर्षक दिसते. यामुळे लोक फसतात. अस्सल चांदीचा भाव ३७५०० रुपये किलो आहे, तर झीरो टन चांदी १ हजार रुपये किलोने मिळते.