क्रिकेटचा देव उतरला विकासाच्या मैदानात; गोयकरवाडीसाठी 5 लाखाचा निधी
By admin | Published: April 12, 2017 05:32 PM2017-04-12T17:32:09+5:302017-04-12T17:32:09+5:30
तो करोडो किक्रेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. तो जेव्हा मैदानावर उतरायचा तेव्हा त्याची बॅट तळपायची. तो खेळायचा तेव्हा धावांचा पाऊस पडायचा.
अरविंद हजारे / आॅनलाईन लोकमत
जवळा (अहमदनगर), दि. 12 - तो करोडो किक्रेटप्रेमींच्या गळ्यातला ताईत आहे. तो जेव्हा मैदानावर उतरायचा तेव्हा त्याची बॅट तळपायची. तो खेळायचा तेव्हा धावांचा पाऊस पडायचा. म्हणूनच ‘त्याला’ क्रिकेटचा देव म्हणतात. तो जितका शांत तितकाच संवेदनशीलही. होय आपण बोलतोय ते मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर विषयी. क्रिकेटचा हा देव आता खेडी विकासाच्या मैदानात उतरलाय़ त्याने जामखेड तालुक्यातील दोन गावांतील विकासकामांसाठी त्याच्या खासदार निधीतून ५ लाख ४१ हजार ७७५ रुपयांचा निधी दिला आहे.
सचिन तेंडूलकर राज्यसभेत खासदार आहे़ खासदार निधीतून जवळा व गोयकरवाडी गावातील विकासासाठी निधी मिळावा, अशी संतराम सूळ, डॉ़ दीपक वाळूंजकर आदींनी २०१६ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सचिन तेंडूलकर यांच्याकडे पत्रान्वये केली होती़ या पत्राची दखल घेत सचिन तेंडुलकर यांनी जवळा व गोयकरवाडी गावासाठी निधी देण्याची मान्य केले़ सोमवारी (दि़१०) निधी मान्य झाल्याचे पत्र प्रशासनाला मिळाले आहे़ या पत्रानुसार सचिन तेंडुलकरने यांनी आपल्या खासदार निधीतून जामखेड तालुक्यातील जवळा येथील गोयकरवाडी गावाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी १ लाख ९९ हजार ६२१ व जवळा येथील जिल्हा परिषद शाळेला शौचालय बांधण्यासाठी ३ लाख ४२ हजार १५४ रुपये असे एकूण ५ लाख ४१ हजार ७७५ रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी खासदारांच्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत २०१६-१७ या कालावधीसाठी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केला जाणार आहे. खासदार सचिन तेंडुलकर यांना सामान्य नागरिकांनी पत्र पाठवले़ कोणाचीही मध्यस्थी नाही की कोणाची शिफारस नाही. केवळ सामान्य नागरिकांनी प्रशासनाच्या मदतीने पाठविलेल्या पत्राची दखल घेत खासदाराने निधी दिल्याचा दुर्मिळ योग भारतीय राजकारणात सचिन तेंडूलकर यांनी जुळवून आणला आहे.
क्रिकेटचा देव असलेल्या तेंडुलकर यांनी आपल्या खासदार निधीतून गावातील विकासकामासाठी केलेली मदत ग्रामीण भागातील राजकीय नेत्यांसाठी एक आदर्श असून देशातील अन्य खासदार सचिन तेंडूलकर यांची प्रेरणा घेणार का? हा प्रश्नच आहे.