निवडणूक कधी होईल हे ईश्वर, न्यायालयालाच ठाऊक : देवेंद्र फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 11:13 AM2022-10-26T11:13:38+5:302022-10-26T11:14:22+5:30
दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या.
मुंबई : मुंबईसह राज्यातील महापालिका निवडणूक कधी होणार हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक, असे विधान करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणुकांबाबतची अनिश्चितता कायम असल्याचे स्पष्ट केले. दिवाळीनिमित्त पत्रकारांना दिलेल्या स्नेहभोजनानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा केल्या.
लोकशाही व्यवस्थेत प्रशासकाने फार काळ संस्था चालवणे योग्य नाही. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. निवडणुका घेण्याचे अधिकार या संस्थेला आहेत. महापलिका निवडणुकीचा विषय राज्य सरकारकडे प्रलंबित नाही. न्यायालयाने ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने निवडणुकीचा विषय हा न्यायालय आणि आयोगाकडे आहे. त्यामुळे महापलिका निवडणुका कधी होतील, हे ईश्वर आणि न्यायालयालाच ठाऊक असल्याचे फडणवीस म्हणाले.
राजकारणात कटुता वाढली
अलीकडच्या काळात राज्याच्या राजकारणात कटुता वाढल्याचे फडणवीस यांनी यावेळी मान्य केले. मात्र, राजकारणात कटुता असू नये, वैमनस्य असू नये, ती महाराष्ट्राची संस्कृती नाही. कटुता असेल तर ती सगळ्यांनीच हळूहळू कमी केली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. मीदेखील करेन, पण एक चांगले आहे की, सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांशी माझा अद्यापही संवाद आहे. उद्धव ठाकरे यांना अद्याप दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या नाहीत, त्यांच्याही आल्या नाहीत, पण अजून दिवाळी संपायची आहे, असेही ते म्हणाले.
पुन्हा युती होणार का?
राजकारणात अशक्य काहीच नसते. हा सिद्धांत पाहता उद्धव ठाकरे यांच्यासोबत कधी पुन्हा युती होईल का, असे विचारले असता, राजकारणात अशक्य काहीच नसते हे खरे असले तरी जर-तरच्या प्रश्नांनादेखील राजकारणात उत्तरे नसतात. ती दिली तर संशयाचे वातावरण उगाचच निर्माण होते, असे फडणवीस म्हणाले.
...आवाज न करणारे फटाके
महाराष्ट्राच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी जोरदार धमाके करणारे देवेंद्र फडणवीस यांना स्वत:ला मात्र आवाज न करणारे फटाके फोडायला आवडतात. नवनवीन गाड्या रात्री-बेरात्री एकट्यानेच ते अजूनही मुंबईत ड्राईव्ह करतात. राजकारणाच्या पलीकडच्या प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. आपण रात्री-बेरात्री मरिन ड्राईव्ह वगैरे ठिकाणी मित्रांकडील नवीन गाडीने तास-दोन तास फेरफटका मारत असतो, अशी नवीन माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. भुईचक्र, अनार असे आवाज न करणारे फटाके मला फोडायला आवडतात, माझे राजकीय फटाकेही आवाज करणारे नसतात, अशी कोटीही त्यांनी केली.
मी ‘सागर’वर सुखी आहे
वर्षा बंगल्यावर जाऊ न शकल्याबद्दल छेडले असता, फडणवीस म्हणाले, शेवटी वर्षा सागरालाच जाऊन मिळते. बंगला कुठला ते महत्त्वाचे नाही. काम महत्त्वाचे असते. सध्या मी सागर/मेघदूतमध्ये आहे, सागर सकारात्मक आहे. मी इथे सुखी आहे. वर्षावर जाण्याचा कुठलाही विचार नाही. ‘आपल्यात संयम खूप आहे आणि तो इतक्या वर्षांच्या अनुभवातून आलेला आहे. फक्त भूक लागली की, माझा संयम ढळतो,’ असे खुसखुशीत उत्तर त्यांनी एका प्रश्नात दिले.
शिंदेंचा दिनक्रम हा संशोधनाचा विषय
रात्री उशिरापर्यंत जागून सकाळी पुन्हा दिनक्रम सुरू करणे हा माझ्या सवयीचा भाग आहे. मी रात्री तीनला झोपतो आणि आठला उठतो. पाच तास झोप घेतो, पण आठवड्यातून तीन-चार दिवस असे होते की, मला सकाळी ६ ला उठून तयार व्हावे लागते, पण या दिनक्रमाची आता सवय झाली आहे. मुख्यमंत्री शिंदे तर रात्री झोपतच नाहीत. बहुधा त्यांचा दिनक्रम हा संशोधनाचा विषय आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.