भगवान सहाय यांची कृषी खात्यातील फेरनियुक्ती रद्द
By Admin | Published: August 22, 2016 05:43 AM2016-08-22T05:43:18+5:302016-08-22T05:43:18+5:30
मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले वादग्रस्त सनदी अधिकारी भगवान सहाय यांना अखेर कृषी खात्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
मुंबई : असंवेदनशील वर्तनामुळे मंत्रालयीन कर्मचाऱ्यांच्या टीकेचे लक्ष्य बनलेले वादग्रस्त सनदी अधिकारी भगवान सहाय यांना अखेर कृषी खात्यातून हद्दपार करण्यात आले आहे. रविवारी सरकारने सहाय यांच्या फेरनियुक्तीचा आदेश मागे घेतला.
कृषी खात्यात अप्पर मुख्य सचिव पदावर असताना, भगवान सहाय यांच्यावर असंवेदनशील वर्तनाचा आरोप झाला. कारवार्ईची मागणी करत मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. सहाय यांना १२ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा निर्णय झाला, परंतु २४ तासही होत नाहीत, तोवर नवा आदेश काढण्यात आला. सुट्टीवरून परतल्यावर सहाय यांना पुन्हा त्याच पदावर नियुक्त केले जाईल, असा लेखी आदेशच शनिवारी सरकारने काढला होता. सहाय यांना पुन्हा त्याच पदावर नेमल्यास आंदोलनाचा इशाराही कर्मचारी संघटनांनी दिला होता. याची दखल घेत, रविवारी शासनाकडून सुधारित आदेश जारी करण्यात आला आणि कृषी विभागातील फेरनियुक्तीबाबतचा भाग वगळण्यात आला आहे.
मात्र, नव्या आदेशात भगवान सहाय सुट्टीनंतर नक्की कोणत्या पदावर रूजू होतील, याचा उल्लेख नाही. कृषी विभागाचे सहसचिव राजेंद्र घाडगे यांच्या मुलाने आत्महत्येचा इशारा दिला होता. त्यामुळे घाडगे यांनी घरी जाण्याची परवानगी मागितली होती. सहाय यांनी ती नाकारली होती. त्यानंतर घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी संबंधित अधिकारी मूळ गावी गेले असता, त्यांच्याकडे रजेच्या अर्जाबद्दल सहाय यांनी जाब विचारला. त्यांच्या या असंवेदनशील वर्तनावर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांत नाराजी पसरली आहे. (प्रतिनिधी)