गोदा कोपली कोपली
By Admin | Published: August 6, 2016 01:05 PM2016-08-06T13:05:17+5:302016-08-06T13:05:17+5:30
म्हणू नका चांडाळांनो गोदा कोपली कोपली जिला रामाने पूजीली तिची दशा काय केली
>- मानसी देशमुख
म्हणू नका चांडाळांनो
गोदा कोपली कोपली
जिला रामाने पूजीली
तिची दशा काय केली
रामकुंडी या माझीया
झाले श्राद्ध दशरथांचे
त्याचे वाळवंट पार
सांगा तुम्हीच ना केले?
स्वर्गातून ब्रम्हगिरी
मला देवांनी आणिले
अमृताच्या माझ्यापात्री
तुम्ही गटार ओतले!
प्राणी, धरा युगे युगे
अविरत मी पोशिले
धरणे बांधूननिया मला
तुम्ही कोरडे पाडले
कृतज्ञता मातेपोटी
नाही तुमच्या मनात
जिने जगविले तुम्हा
फास तिच्याच गळ्यात !
कुणी घालतो भराव
माझ्या अमृत पात्रात
कुणी बांधतो इमले
माझ्या नद्या ओहोळात
शोष पडे विहिरींना
लाभे नापिकी शेतांना
तरी जाग नाही तुम्हा
कलीयुगीच्या दैत्यांना
असा झाला अनाचार
त्याचा सोसवेना भार
धडा शिकविण्या तुम्हा
आला मला महा पूर
शिका धडा आत्ता तरी
बुध्दी जरी थोडीशी उरली
म्हणू नका चांडाळांनो
गोदा कोपली कोपली
(लेखिका नाशिकमधल्या दांडेकर टेक्निकल इन्स्टिट्युटच्या प्राचार्या आहेत)