गोदावरीला पूरसदृश स्थिती, शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेल्याची भीती

By Admin | Published: July 14, 2017 03:38 PM2017-07-14T15:38:28+5:302017-07-14T15:38:28+5:30

नाशिक शहर जलमय : दाढेगावचा संपर्क खंडित, सिडकोत भाजीपाला भिजला

Godavari feared the flood situation, the school boy was carried across the Nallah | गोदावरीला पूरसदृश स्थिती, शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेल्याची भीती

गोदावरीला पूरसदृश स्थिती, शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेल्याची भीती

googlenewsNext

लोकमत ऑनलाइन 

नाशिक, दि. 14 - जुलै महिन्याच्या प्रारंभापासून दडी मारून बसलेल्या पावसाने गुरुवारी रात्रीपासून जोर धरला असून, मध्यरात्री कोसळधार बरसणाऱ्या पावसाने शहरातील गोदावरी व नासर्डीसह अन्य नद्यानाल्यांना पाणी वाढले असून, पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागांत पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली आहे. जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचवटीत गोदापात्रात एक मुलगा वाहून गेल्याची भीती असून, त्याचा शोध सुरू आहे.

पंचवटीत रामकुंडावर पूरसदृश स्थिती, वाहून गेलेल्या मुलाचा शोध


पावसामुळे गोदावरी नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली असून, नदीपात्रात उभ्या असलेल्या दुतोंड्या मारोतीच्या कमरेपर्यंत पाणी साचले आहे. गोदाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गोदाकाठी दशक्रिया विधीसाठी सकाळीच आलेल्या नागरिकांचे हाल झाले. वस्त्रांतरगृह आणि अन्य धर्मशाळांमध्ये हे विधी पार पडले. सकाळी रामकुंड परिसरात उभी असलेली मोटार नदीत वाहून गेली. तथापि, नागरिकांनी परिश्रमपूर्वक ती कार अडवली. पंचवटीत मोरे मळा परिसरात एका नाल्यात परिसरातील दहा ते बारा वर्षांचा मुलगा वाहून गेल्याची घटना घडली. अग्निशामक दलाच्या वतीने या मुलाची शोध मोहीम सुरू आहे. पंचवटी विभागीय कार्यालयासमोरील मखमलाबाद येथे एक कडुनिंबाचे झाड दोन मोटारींवर पडल्याने या मोटारींचे नुकसान झाले. काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. महापालिकेच्या वतीने ध्वनीक्षेपकावरून सतर्कतेच्या सूचना दिल्या जात आहेत.

सातपूर साचलेल्या पाण्यावर आंदोलन


मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाळे सातपूर परिसरात जागोजागी पाणी तुंबले आहे. पपया नर्सरी चौक, सातपूर विभागीय कार्यालय, एमआयडीसीतील बॉश कंपनीसमोर, आयटीआय सिग्नल, आयटीआय पूल आदि भागात पाणी साचले आहे. रहदारीस अडथळा निर्माण झाला असून ट्रॅफिक जाम झाली आहे. महापालिकेने नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण न केल्याने पाणी साचल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या वतीने साचलेल्या पाण्यात ट्युब टाकून जलतरण करीत महापालिकेतील भाजपाचा निषेध करण्यात आला. पावसामुळे सोमेश्वर येथे दूधसागर धबधबा वाहू लागला असून, तो पाहण्यासाठी भरपावसात तरुणाईची झुंबड उडाली आहे.

सिडकोत भाजीविक्रेत्यांचे नुकसान
बडदेनगर, गणेशचौक, साईबाबा चौक, लेखानगर आदि मुख्य रस्त्यावर पावसाचे पाणी साचले आहे. पावसाच्या पाण्यामुळे पवनगर, उत्तमनगर, उपेंद्रनगर, त्रिमूर्तीचौक आदि ठिकाणच्या भाजीविक्रेत्यांनी रात्री आणून ठेवलेला भाजीपाला भिजल्याने मोठे नुकसान झाले. भाजी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांचीही तारांबळ उडाली. तानाजी चौक, बाजीप्रभू चौक येथे तातडीने नालेसफाई केल्याने घरात पाणी घुसण्याचा धोका टळला.

नाशिकरोडला नद्यांमध्ये वाढले पाणी
रात्रभरापासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे गोदावरी, वालदेवी, दारणा नद्या दुथडी भरून वाहत आहे. नाशिकरोड परिसरातील बहुतांशी भाजीमंडईतील दुकाने बंद असून, शुकशुकाट आहे. पावसामुळे हमरस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. जागोजागी पाण्याचे पाट वाहत आहे. भीमनगर परिसरातील मनपा कार्यालयाच्या परिसरात एक झाड उन्मळून पडले. मात्र कोणतेही नुकसान झाले नाही. शहरातील नाशिक-पुणे रोडवर पाणी साचल्याने वाहतूक संथगतीने जात आहे.

शिवाजीवाडीतून स्थलांतराच्या सूचना
नासर्डी नदी दुथडा भरून वाहत आहे. शिवाजीवाडी परिसरात नदीकाठच्या नागरिकांना तातडीने जागा रिकाम्या करून स्थलांतराची सूचना केली आहेत. नाशिक पूर्व विभातील धोकादायक काझी गढीवरील काही नागरिकांनी जागा सोडल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गढीचा काही भाग कोसळला होता. त्यामुळे या पावसाळ्यातही धोकाकायम आहे.

दाढेगावशी संपर्क तुटला
संततधार पावसामुळे देवळालीकॅम्पमध्ये ठिकठिकाणी पाणी साचले आहे. सकाळपासून पाऊस न थांबल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहेत. वालदेवी नदीला आलेल्या पुरामुळे दाढेगावचा पाथर्डी गावाशी असलेला संपर्क तुटला आहे.

 

Web Title: Godavari feared the flood situation, the school boy was carried across the Nallah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.