गोदावरीला पूर; दुतोंड्या मारूती बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 06:43 PM2017-07-23T18:43:23+5:302017-07-23T18:43:23+5:30
गंगापूर धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे पाच वाजता गोदावरीला पूर आला. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे चित्र होते.
आॅनलाइन लोकमत / नाशिक : गंगापूर धरणातून सातत्याने होणाऱ्या विसर्गामुळे पाच वाजता गोदावरीला पूर आला. गोदावरीने धोक्याची पातळी ओलांडल्याचे चित्र होते. दोन पूल वगळता सर्व पूल पाण्याखाली गेले आहे. गाडगे महाराज पूलावर पूर बघण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. संध्याकाळी पाच वाजता गंगापूर धरणातून पंधरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला.
रविवारी सकाळी गंगापूर धरणातून साडेआठ वाजेपासून दहा हजार २७८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र दुपारी तीन वाजेपासून धरणसमुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे गंगापूर धरणातून चार वाजेपासून विसर्ग वाढविण्यास सुरूवात झाली. साडे पाच वाजेपर्यंत चार हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. शहरात होणारा पाऊस त्यामुळे गोदापात्रात जाणारे पाणी आणि धरणाचा विसर्ग लक्षात घेता अहल्यादेवी होळकर पूलाखालून पाच वाजेपासून पुढे सतरा हजार क्युसेक इतक्या पाणी प्रवाहित झाले होते. यामुळे गोदावरीला पूर आला. गोदाकाठावरील मोठे मंदिरे वगळता सर्व मंदिरे बुडाली होती. नारोशंकर मंदिर देखील निम्म्याहून अधिक बुडाल्याचे चित्र संध्याकाळी पहावयास मिळाले.
तीन तासांत वाढली दुप्पट पातळी
होळकर पूलावरून पुढे ९ हजार ४७० क्यूसेक पाणी गोदापात्रात दुपारपर्यंत प्रवाहित झाले होते. दुतोंड्या मारूतीच्या छातीच्या वरपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती; मात्र संध्याकाळी पाच वाजेपासून नदीच्या पातळीत सुमारे दुपटीने वाढ होऊन सतरा हजार क्युसेकपर्यंत पाणी होळकर पूलाखालून प्रवाहित झाले होते. त्यामुळे दुतोंड्या मारुतीची मुर्तीच्या डोक्यावरून पुराचे पाणी वाहू लागले होते.
संडे टुरिझम अॅट गोदाकाठ
गोदावरीचे सर्व लहान पुल पाण्याखाली गेले आहे. पूर बघण्यासाठी संत गाडगे महाराज पूल, टाळकुटेश्वर पूल, अहल्यादेवी होळकर पूल, लक्ष्मीनारायण पूल परिसरात नागरिकांची गर्दी होत आहे. रविवारची सुटी असल्याने नाशिककर पूर बघण्यासाठी कुटुंबासमवेत सकाळी अक रा वाजेनंतर घराबाहेर पडण्यास सुरूवात झाली. दुपारपासून पूलांवर गर्दी वाढली असून नागरिक पूलावरच वाहने उभी करत असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्याही निर्माण होत आहे.