गोदावरीला पूरसदृश परिस्थिती; विक्रेत्यांची उडाली धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 10:05 PM2017-08-28T22:05:04+5:302017-08-28T22:10:24+5:30
गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली.
नाशिक : गंगापूर धरण समूहाच्या पाणलोट क्षेत्रात सकाळपासूनच दमदार पाऊस सुरू होता; मात्र दुपारी पावसाने जोर धरल्याने धरणामधून विसर्ग वाढविण्यात आल्यामुळे संध्याकाळी गोदेच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. यामुळे काठावरील विक्रेत्यांची धावपळ उडाली.
रविवारच्या तुलनेत सोमवारी (दि.२८) पावसाने शहरात उघडीप दिली. त्यामुळे शहरात कमी पाऊस पडला असला तरी गंगापूरचे पाणलोट क्षेत्र ओळखल्या जाणाºया त्र्यंबकेश्वर तालुक्यात मात्र जोरदार पाऊस झाला. तसेच गंगापूर धरण समूहाच्या परिसरात सोमवारी १२ तासांत ९० मि.मी. पाऊस झाला. रविवारच्या तुलनेत पावसाचे प्रमाण दुप्पट झाले. त्यामुळे दिवसभर गंगापूरमधून विसर्ग सुरूच होता.
सातत्याने विसर्गामध्ये वाढ होत गेली. संध्याकाळी ५ वाजता दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती; मात्र रात्री दुतोंड्या मारुतीच्या गळ्यापर्यंत पाणी लागले होते. कारण रात्री ८ वाजता सात हजार १०५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग गंगापूर धरणातून सुरू करण्यात आला होता. यामुळे गोदावरीला संध्याकाळपासूनच पूर परिस्थिती निर्माण झाली होती.
यामुळे काठावरील विक्रेत्यांसह पूजाविधीसाठी आलेल्या भाविकांची धावपळ झाली. कपालेश्वरजवळील पाणपोईपर्यंत पाण्याची पातळी पोहचली होती. यामुळे गोदावरी प्राचीन मंदिरासह, गंगा-गोदावरी मंदिर निम्म्याहून अधिक बुडाले होते. तसेच निलकंठेश्वर मंदिराच्या नंदीपर्यंत पाणी पोहचले होते. तसेच देवमामलेदार मंदिराचे प्रवेशद्वारही पाण्याखाली गेले होते. एकूणच रात्री पाण्याची पातळी प्रचंड वाढल्याने अग्निशामक दलाकडून सतर्कतेचा इशारा दिला जात होता.