गोदावरीने गाठली धोक्याची पातळी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 05:02 AM2017-07-24T05:02:08+5:302017-07-24T05:02:08+5:30
नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : नाशिकमधील संततधार पावसामुळे गंगापूर धरणातून सुमारे १४ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने गोदावरीला पूर आला असून नदीने धोक्याची पातळी गाठली आहे. नाशिकच्या पुराचे परिमाण असणारा दुतोंड्या मारुती पूर्णपणे बुडाला आहे. जिल्ह्यातील सर्व धरणांमधून पाण्याचा विसर्ग होत आहे. गोदावरीला पूर आल्याने जायकवाडी धरणातही हळूहळू नवीन पाण्याची आवक होत आहे.
नाशिकमधील पेठ तालुक्यात नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातील भीमा, मुळा नद्यांना पूर आला आहे. नाशिकला सोमेश्वर धबधब्यावर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सायंकाळी चार वाजेनंतर गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. एकूण चार हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील गोदाकाठच्या गावांना इशारा
नाशिक जिल्ह्याच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्प क्षेत्र तसेच औरंगाबाद जिल्हा व जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील प्रकल्पाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने गंगापूर, वैजापूर व पैठण तालुक्यांतील गोदावरी नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. वैजापूर तालुक्याच्या हद्दीतील डोणगाव शिवारातील नदीपात्रात पहाटेच्या सुमारास पाणी येऊन धडकले. पाण्याची गती पाहता रात्रीतून ते जायकवाडीत पोहोचेल.
भीमाच्या विसर्गात दुपटीने वाढ : अहमदनगर जिल्ह्यांतून जाणाऱ्या गोदावरी, भीमा, मुळा नद्यांचा विसर्ग दुपटीने वाढला आहे. भंडारदरा धरण भरत आले आहे. मुळा धरणातही जोरदार आवक सुरू आहे.
भुशी धरणाच्या पायऱ्यांवरील बंदी झुगारली
पुणे जिल्ह्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवर मागील ३५ वर्षांत एकाही पर्यटकाचा अपघात झालेला नसताना पोलीस प्रशासन पर्यटकांची अडवणूक का करीत आहे, असे आकांडतांडव करत रविवारी नगराध्यक्षा सुरेखा जाधव व उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यासाठी प्रवेश मोकळा करून दिला. बंदी झुगारून ते पर्यटकांना धरणाच्या पायऱ्यांवर घेऊन गेले. बंदीमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आल्याचे त्यांनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्रात विश्रांती
कोल्हापूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने विश्रांती घेतली; त्यामुळे पंचगंगा
नदीच्या पुराच्या पातळीत घट होत आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग व सांगलीत पावसाने विश्रांती घेतली आहे.
‘सेल्फी’ने तरुणाचा बळी
चाळीसगाव (जि. जळगाव) तालुक्यातील पाटणादेवी धबधब्याजवळील कुंडावर सेल्फी काढत असताना पाय घसरून पडल्याने योगेश्वर राजेश्वर भोरे (२३, रा. कुंडलवाडी, जि.नांदेड) याचा रविवारी दुपारी मृत्यू झाला.