गोदातीरी आज पहिले कुंभस्नान
By admin | Published: August 29, 2015 02:11 AM2015-08-29T02:11:05+5:302015-08-29T02:11:05+5:30
धर्म व अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत.
नाशिक : धर्म व अध्यात्माची सांगड घालत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याची अपूर्वाई अनुभवण्यासाठी लाखो श्रद्धाळू नाशिक व त्र्यंबकेश्वरी दाखल झाले आहेत. श्रावण शुद्ध पौर्णिमा अर्थात शनिवारी गोदातीर्थावर पहिले कुंभस्नान होणार आहे. त्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर नगरी नटल्या आहेत.
शाही पर्वणीच्या नियोजनासाठी गेल्या दोन-तीन वर्षांपासून अहोरात्र झोकून देणाऱ्या प्रशासनाची शनिवारी कसोटी लागणार आहे. नाशिकक्षेत्री गोदावरी नदीवरील रामकुंड आणि त्र्यंबकक्षेत्री कुशावर्त तीर्थावर सर्वप्रथम साधू-महंतांचे शाहीस्नान होईल, त्यानंतर भाविकांना रामकुंड व कुशावर्त खुले केले जाईल. त्र्यंबकेश्वरी शनिवारी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर ४.१५ वा. जुना आखाड्याचे साधू-महंत प्रथम शाहीस्नान करतील, तर नाशिकला सकाळी ७ वा. निर्वाणी अनी आखाड्याचे साधू-महंत शाहीस्नान करतील. सर्वसाधारणपणे नाशिकला सकाळी ९, तर त्र्यंबकेश्वरला सकाळी १०.३० वाजेपर्यंत शाहीस्नानाचा सोहळा संपन्न होईल. त्यानंतर धर्मोत्सवाचे सर्वात मोठे आकर्षण असलेल्या दोन्ही शाही मिरवणुकांचा नयनमनोहारी सोहळा भाविकांना अनुभवता येईल.
शाही पर्वणी निर्विघ्न पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने शुक्रवारी सायंकाळपासूनच रामकुंड आणि कुशावर्ताचा ताबा घेतला. साधू-महंतांचे स्नान होईपर्यंत भाविकांना दोन्ही तीर्थांवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
साध्वींची स्वतंत्र व्यवस्था नाही
महिला साध्वींच्या स्वतंत्र स्नानाची व्यवस्था पहिल्या पर्वणीत करण्यात आलेली नाही. प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था व वेळ देण्याच्या साध्वी त्रिकाल भवंता यांच्या दाव्याबाबत न्यायालयाने तोडगा काढण्याचे सुचविले आहे. सोमवारी त्याबाबत बैठक होणार आहे.
शाही स्नानास सुरुवात
त्र्यंबकेश्वर ब्रह्ममुहूर्तावर पहाटे ४.१५
वाजता
नाशिक सकाळी
७ वाजता
़़़अन् साध्वींना
कोसळले रडू
महिला साध्वींच्या स्नानासाठी स्वतंत्र व्यवस्था व वेळेची मागणी प्रशासनाकडे फेब्रुवारीपासून करीत आहे, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले़ आखाड्यांच्या शाहीस्नानाची नव्हे, तर त्यांच्या नंतरची वेळ दिली असती तरी चालले असते़ केवळ महिला साध्वी म्हणून न्याय मिळत नाही, अशी कैफियत साध्वी त्रिकाल भवंता यांनी शुक्रवारी त्यांच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायाधीशांकडे मांडली़ साध्वींची व्यथा मांडताना त्यांना रडू कोसळले़
पोलीस बंदोबस्त
कर्मचारी : १५,०००
आयुक्त : १
उपायुक्त : १५
साहाय्यक आयुक्त : ४४
पोलीस निरीक्षक : २००
पोलीस उपनिरीक्षक : ६००
बॉम्बशोधक व नाशक पथके : १३
एसआरपीएफ : चार तुकड्या
फोर्स वन : दोन तुकड्या
क्यूआरटी : दोन तुकड्या
एटीएस, एसआयडी, सीआयडी
व आयबीची स्वतंत्र पथके