गोडसेचे उदात्तीकरण देशासाठी घातक - श्रीपाल सबनीस
By admin | Published: December 10, 2015 03:05 AM2015-12-10T03:05:03+5:302015-12-10T03:05:03+5:30
महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत
सांगली : महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे उदात्तीकरण म्हणजे गांधींच्या महात्म्याचा पुन्हा खून करण्याचा प्रकार आहे. अशा गोष्टी देशासाठी प्रचंड घातक आहेत. अशा प्रवृत्ती कायमच्याच संपल्या पाहिजेत, असे मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य श्रीपाल सबनीस यांनी बुधवारी व्यक्त केले.
येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना सबनीस म्हणाले, मार्क्सचा विचार घेऊन कॉ. गोविंद पानसरे उभे राहिले होते. अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार घेऊन डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विचार घेऊन एम. एम. कलबुर्गी उभे राहिले होते. मात्र या तिघांचीही हत्या करण्यात आली. हा भारतीय लोकशाहीचा, तुमचा आणि आमचा खून आहे. ही प्रवृत्ती आणि ही परंपरा कायमची संपली पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, २0१५मध्ये गोडसेच्या नावाने सोहळे साजरे केले जात आहेत. ही गोष्ट हिंदूंचा उन्माद बाळगणाऱ्या लोकांसाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना शोभनीय नाही.
सरकारच्या संवेदना का संपल्या आणि कोणी मारल्या, हे आपणास कळेनासे झाले आहे. हे वातावरण चांगले नाही. कलेला कधी जात आणि धर्म नसतो. तसे असते तर बिसमिल्ला खाँसाहेबांची शहनाई प्रत्येक जाती-धर्माच्या सोहळ्यामध्ये वाजली नसती. कला आणि संस्कृतीला अशा बंधनात बांधणेही चुकीचे आहे.
> ‘इसिस’चा जगभरात धोका
पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ हे कुचकामी नेतृत्व आहे. भविष्यात याठिकाणची सत्ता लष्कराच्या हाती जाईल आणि चुकून लष्कराची अण्वस्त्रे लष्कर-ए-तय्यबा किंवा ‘इसिस’सारख्या संघटनांच्या हाती गेली, तर जगाचा एकतृतियांश भाग कायमचा संपुष्टात येईल.
म्हणून जागतिक पातळीवर इसिस व अन्य दहशतवादी प्रवृत्तींचा धोका सर्वांनाच आहे, असे मतही सबनीस यांनी यावेळी व्यक्त केले.