GokulMilk Election Kolhapur : गोकुळच्या निवडणूकीत मंत्री,खासदार-आमदारांची मुले रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 01:05 PM2021-04-20T13:05:22+5:302021-04-20T13:09:16+5:30
GokulMilk Election Kolhapur :महाराष्ट्रातील सहकारी दूध उद्योगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणूकीतील सत्तारुढ व विरोधी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी येथे करण्यात आली. सत्तारुढ आघाडीने १२ विद्यमान संचालकांना व नऊ नवीन उमेदवारांना संधी दिली. विरोधी आघाडीमध्ये दोन विद्यमान व एका माजी संचालकांसह १८ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली.
कोल्हापूर : महाराष्ट्रातील सहकारी दूध उद्योगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणूकीतील सत्तारुढ व विरोधी आघाडीच्या उमेदवारांची घोषणा मंगळवारी येथे करण्यात आली. सत्तारुढ आघाडीने १२ विद्यमान संचालकांना व नऊ नवीन उमेदवारांना संधी दिली. विरोधी आघाडीमध्ये दोन विद्यमान व एका माजी संचालकांसह १८ नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली.
संघाची निवडणूक येत्या २ मे व निकाल ४ मे रोजी आहे. संघाचे ३५५० सभासद निवडणूकीचा हक्क बजावतील. सुमारे साडेतीन हजार कोटींची वार्षिक उलाढाल आणि देशभरात नांवलौकिक मिळवलेला ब्रँन्ड अशी गोकुळची ओळख आहे. या संघाची सत्ता काबीज करण्यासाठी मंत्री, खासदार,आमदारांपासून इतरही मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे.
संघामध्ये काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांची गेली सुमारे तीस वर्षे सत्ता आहे. त्या सत्तेला काँग्रेसचे नेते व पालकमंत्री सतेज पाटील, राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि विधानसभेत भाजपला पाठिंबा दिलेले जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी आव्हान दिले आहे. सहकारी संस्थेची निवडणूक असली तरी तिथे काँग्रेस-भाजप विरोधात महाविकास आघाडी अशी ढोबळमानाने लढत होत आहे. सत्तारुढ आघाडीचे नांव राजर्षि शाहू आघाडी तर विरोधी आघाडीचे नांव राजर्षि शाहू शेतकरी विकास आघाडी असे आहे.
सत्तारुढ आघाडीतून संघाचे विद्यमान अध्यक्ष रविंद्र आपटे, भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांच्या पत्नी शौमिका महाडिक, माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांचा मुलगा दीपक, माजी आमदार संजय घाटगे यांचा मुलगा अंबरिश, काँग्रेसचे माजी आमदार बजरंग देसाई यांचा मुलगा धैर्यशील, माजी आमदार बाबासाहेब पाटील यांची पत्नी अनुराधा पाटील या उमेदवारांचा समावेश आहे.
विरोधी आघाडीतून मंत्री मुश्रीफ यांचा मुलगा नविद, खासदार मंडलिक यांचा मुलगा विरेंद्र, राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील यांची पत्नी सुश्मिता पाटील, माजी आमदार के.पी.पाटील यांचा मुलगा रणजित, माजी आमदार दिवंगत संजय गायकवाड यांचा मुलगा कर्णसिंह, माजी आमदार दिवंगत यशवंत एकनाथ पाटील यांचा मुलगा अमर, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रदिप नरके यांचा भाऊ अजित नरके यांचा समावेश आहे.
सत्तारुढसर्वसाधारण गटातून रविंद्र पांडुरंग आपटे, रणजितसिंह विश्वनाथराव पाटील (मुरगुडकर), दिपक भरमू पाटील, धैर्यशिल बजरंग देसाई, बाळासो उर्फ वसंत नानू खाडे, उदय निवासराव पाटील, अंबरिषसिंह संजय घाटगे. सत्यजीत सुरेश पाटील, सदानंद राजकुमार हत्तरकी, चेतन अरुण नरके, धनाजीराव रामचंद्र देसाई, प्रकाशराव भिमराव चव्हाण, प्रतापसिंह शंकरराव पाटील, राजाराम पांडुरंग भाटळे, रविश उदयसिंह पाटील (कौलवकर), रणजीत बाजीराव पाटील यांना तर भटक्या विमुक्त गटातून विश्वास शंकर जाधव, इतर मागासवर्गीय गटातून पांडुरंग दाजी धुंदरे, महिला राखीव गटातून अनुराधा बाबासो पाटील आणि शौमिका अमल महाडिक यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, तर अनुसूचित गटातून विलास आनंदा कांबळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, विरोधी राजर्षी शाहू शेतकरी आघाडीतून सर्वसाधारण गटातून विश्वास पाटील (आबाजी), अरुण डोंगळे, शशिकांत आनंदराव पाटील चुयेकर, बाबासाहेब श्रीपती चौगले, अजित नरके, नावेद मुश्रीफ, करणसिंह गायकवाड, विरेंद्र मंडलिक, नंदकुमार ढेंगे, अभिजित तायशेटे, प्रकाश रामचंद्र पाटील, रणजित के. पाटील, विद्याधर गुरबे, एस.आर. उर्फ संभाजी रंगराव पाटील, महाबळेश्वर शंकर चौगले, किसन वापुसो चौगले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इतर मागासवर्ग गटातून अमरसिंह यशवंत पाटील, अनुसुचित जाती जमाती गटातून डॉ. सुजित मिणचेकर, भटक्या विमुक्त गटातून बयाजी देवू शेळके आणि महिला राखीव गटातून सुश्मिता राजेश पाटील आणि अंजना रेडेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.