सोन्या-चांदीला पुन्हा झळाळी
By admin | Published: March 21, 2016 12:54 AM2016-03-21T00:54:13+5:302016-03-21T00:54:13+5:30
मागील १९ दिवस ओस पडलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत रविवारपासून पुन्हा ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे.
पुणे : मागील १९ दिवस ओस पडलेल्या लक्ष्मी रस्त्यावरील सोन्या-चांदीच्या बाजारपेठेत रविवारपासून पुन्हा ग्राहकांची लगबग सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने वाढीव अबकारी कराविरुद्ध पुकारलेला बेमुदत बंद मागे घेतल्याने रविवारपासून सोन्या-चांदीची सर्व दुकाने पूर्ववत सुरू झाली. त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या ग्राहकांनीही सुट्टीचा दिवस गाठून खरेदीचा मुहूर्त साधला.
केंद्र सरकारने अंदाजपत्रकामध्ये सोन्याच्या दागिन्यांवर एक टक्का अबकारी कर लावण्याची घोषणा केल्यानंतर देशभरातील सराफी संघटनांनी बेमुदत बंदची हाक दिली होती. पुण्यासह राज्यातही सराफ सुवर्णकार फेडरेशनने या बंदमध्ये उडी घेतली होती. त्यामुळे १ मार्चपासून सर्व सराफी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे पुण्यासह पिंपरी चिंचवड व लगतच्या भागातील दुकानांतून दररोज सुमारे १०० कोटी रुपयांची सोन्या-चांदीची उलाढाल थंडावली होती. मागील १९ दिवसांचा विचार केल्यास सुमारे १९०० कोटी रुपयांची उलाढाल होऊ शकली नाही. तसेच ग्राहकांनाही या दिवसांत सोने-चांदी खरेदी करता आली नाही. त्यामुळे विविध कार्यक्रम, लग्न खरेदीवर त्याचा परिणाम दिसून आला.
अखेर शनिवारी केंद्र शासनाने सराफांच्या विविध मागण्यांवर विचार करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या निर्णयानंतर सराफ संघटनांनी बंद मागे घेतल्याची घोषणा शनिवारी रात्री उशिरा केली. त्यामुळे रविवारी सकाळपासूनच सराफी दुकाने उघडण्यास सुरुवात झाली. मात्र, बंद मागे घेतल्याची घोषणा रात्री उशिरा झाल्याने रविवारी अनेक ग्राहक यापासून अनभिज्ञ होते. त्यामुळे दुकानांमध्ये सकाळी फारशी गर्दी दिसून आली नाही. सोन्याला २८ हजार ९०० रुपये भाव मिळाला.