आंतरराष्ट्रीय फोटो हंटर्स स्पर्धेत ‘लोकमत’चे प्रशांत खरोटे यांनी मिळविले सुवर्ण व रजत पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 04:17 PM2017-09-09T16:17:46+5:302017-09-09T16:27:44+5:30
फोटो हंटर्स असोसिएशननकडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’मधील पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजत पदक प्राप्त केले.
नाशिक : फोटो हंटर्स असोसिएशननकडून भरविण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय ‘फोटो हंटर्स फोटो कॉन्टेस्ट’मधील पत्रकारिता गटात ‘लोकमत’ नाशिक आवृत्तीचे वरिष्ठ छायाचित्रकार प्रशांत खरोटे यांनी एक सुवर्ण व रजत पदक प्राप्त केले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील फोटोग्राफिक सोसायटी आॅफ अमेरिका (पीएसअे) आणि इंटरनॅशनल युनियन आॅफ फोटोग्राफर्स, चीन (आययुपी)च्या संयुक्त विद्यमाने कोलकाता येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फोटो हंटर्स स्पर्धेत एकूण २२ देशांमधील २०० छायाचित्रकारांनी विविध गटांमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी भारतातून एकूण १०५ स्पर्धक होते तर पत्रकारिता गटात एकूण ५८ स्पर्धकांचा सहभाग होता. त्यामध्ये २१ छायाचित्रे बक्षीसपात्र ठरली. या गटात पीएसएच्या प्रथम क्रमांकाचे सुवर्ण पदकाचे मानकरी भारतातून खरोटे हे एकमेव ठरल्याची माहिती स्पर्धेचे अध्यक्ष अभिजित बॅनर्जी यांनी दिली. मागील तीन वर्षांपासून कोलकाता शहरात ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील छायाचित्र स्पर्धा आयोजित केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी खरोटे यांनी गरीब-श्रीमंतीमधील विरोधाभास आपल्या छायाचित्रातून टिपला होता. त्यामध्ये एका मोठ्या गृहप्रकल्पाच्या जाहिरातीच्या होर्डिंग्जवर एक तरुणी आरामदायक गादीवर बसून लॅपटॉप हाताळत असल्याचे दाखविण्यात आले होते. याच होर्डिंग्जच्या खाली भुमिगत गटारीच्या ठेवलेल्या सिमेंटच्या पाईपवर एक भटका तरुण पांघरुन घेत निद्रीस्त झाल्याचे खरोटे यांनी हेरले आणि त्यामधील विरोधाभास कॅमेºयात ‘क्लिक’ केला. या छायाचित्राने ‘पीएसअे’चे सुवर्णपदक मिळविले. तसेच जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात दुष्काळाची दाहकता दर्शविणारे दुसरे छायाचित्र रजत पदकास पात्र ठरले. या छायाचित्रामध्ये खरोटे यांनी दोन आदिवासी महिला एका पडक्या विहिरीत गाळामध्ये साचलेल्या डबक्यातून लाकडी शिडी लावून डोक्यावर पाण्याचे हंडे घेत वर येत असल्याचे स्थिती टिपली होती.
सदर दोन्ही छायाचित्रांना ‘लोकमत’ने नाशिक आवृत्तीमध्ये प्रसिध्दी दिली होती. फोटोग्राफिक सोसायटी आॅफ अमेरिका जगाच्या सर्वात मोठी संघटना आहे.