अधिक मास संपताच सोने स्वस्त; ५८,८०० रुपये तोळा, चांदीतही चढ-उतार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 07:18 PM2023-08-20T19:18:51+5:302023-08-20T19:19:16+5:30
भाव सव्वा महिन्याच्या नीचांकीवर, गेल्या महिन्यात ६ जुलै रोजी ५८ हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर असलेल्या सोन्याचे भाव अधिक मास सुरू झाल्यानंतर वाढू लागले.
विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या अनेक दिवसांपासून ५९ ते ६० हजारांदरम्यान असलेल्या सोन्याच्या भावात घसरण होऊन ते सव्वा महिन्याच्या नीचांकीवर आले आहे. अधिक मासामुळे सोने-चांदीच्या भावात वाढ झाली होती. आता तीन दिवसांपासून सोने ५८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर असून, चांदीतही चढ-उतार होत आहे. सध्या चांदी ७१ हजार रुपये प्रतिकिलोवर आहे.
जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सोन्याच्या भावात वाढ होत जाऊन ते ५९ हजारांच्या पुढे होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर भाव वाढल्याने भाववाढ तर होतच होती, शिवाय अधिक मास सुरू झाल्याने सोने-चांदीला मागणी वाढली होती. त्यामुळे मध्यंतरी सोने ६० हजारांच्याही पुढे गेले. मात्र, अधिक महिना संपल्यानंतर सोन्याचे भाव कमी होऊन गेल्या तीन दिवसांपासून ते ५८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर स्थिर आहे.
गेल्या महिन्यात ६ जुलै रोजी ५८ हजार ८५० रुपये प्रतितोळ्यावर असलेल्या सोन्याचे भाव अधिक मास सुरू झाल्यानंतर वाढू लागले. १३ जुलै रोजी सोने ५९ हजार ७०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर ते पुन्हा १९ जुलै रोजी ६० हजार २५० रुपयांवर पोहोचले. अशाच प्रकारे किरकोळ चढ-उतार सुरू राहत सोन्याचे भाव ५९ हजार रुपयांच्या पुढे राहिले. मात्र, १६ ऑगस्ट रोजी ५९ हजार ३०० रुपयांवर असलेल्या सोन्याच्या भावात अधिक मास संपताच १७ ऑगस्ट रोजी ५०० रुपयांची घसरण झाली व ते ५८ हजार ८०० रुपये प्रतितोळ्यावर आले.
१६ ऑगस्ट रोजी ७० हजार ६०० रुपये प्रतिकिलोवर असलेल्या चांदीच्या भावात १७ ऑगस्ट रोजी ४०० रुपयांची घसरण होऊन ती ७० हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली. त्यानंतर १८ रोजी मात्र एक हजार रुपयांची वाढ होऊन ती ७१ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचली. १९ रोजी त्यात पुन्हा २०० रुपयांची घसरण झाली.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने-चांदीचे भाव कमी झाले. तसेच आपल्याकडे अधिक मास संपल्याने मागणीवर परिणाम झाल्यानेही भाव कमी होत आहे -भागवत भंगाळे, सुवर्ण व्यावसायिक