पश्चिम विदर्भातील गोल्ड गणेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2016 09:15 PM2016-09-08T21:15:50+5:302016-09-08T21:15:50+5:30
खामगावमध्ये गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झाली असून, विविध रुपातील गणपतींची स्थापना करण्यात आली आहे.
गिरीश राऊत, ऑनलाइन लोकमत
बुलढाणा, दि. 8 - खामगावमध्ये गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झाली असून, विविध रुपातील गणपतींची स्थापना करण्यात आली आहे. तर शहरातील राणा मंडळाचा गणपती पश्चिम विदर्भात श्रीमंत गणपती म्हणून ठरत आहे. या मंडळाचे मूर्तीवर ७० किलो चांदी व साडेतीन किलो सोन्याचे आभुषण चढविण्यात आलेले आहेत. ही मूर्ती पाहण्यासाठी यावषीर्ही भाविकांची गर्दी होत आहे.
राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाला थाटात सुरुवात झाली असून अनेक मंडळांनी आकर्षक गणेशमूर्तींची स्थापना केली आहे.
तर येथील राणा मंडळांचा गणपती सुद्धा भाविकांसाठी आकर्षण ठरत आहे. येथील राणा गणेश मंडळाने सन २००३ मध्ये स्थापनेसाठी नगर येथून श्री गणेश मूर्ती आणली होती. विलोभनीय असे रुप असलेल्या गणेशमूतीर्चे भाविकांच्या विनंतीवरुन विसर्जन न करण्याचा निर्णय मंडळ पदाधिकारी यांनी घेतला. तेव्हापासून दरवर्षी याच मूर्तिची स्थापना केली जाते. हा गणपती नवसाला पावणारा असल्याची भाविकांना श्रद्धा असल्याने भाविकांकडून या गणेशमूतीर्ला सोने व चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहे.
आजरोजी या गणेशमूर्ती ७० किलो चांदी व साडेतीन किलो सोन्याच्या आभुषणांनी सजली आहे. यामध्ये चांदीपासून हात, पाय, कान, मुकुट व छत्र बनविण्यात आलेले आहे. तसेच चांदीचे आकर्षक सिंहासन, ४ किलो चांदीचा मूषक, हत्ती बनविण्यात आलेला आहे. तर सोंडेवरील आभुषण, कानातील बाळ्या, मुकुटातील नक्षी, दात, हार सोन्यापासून बनविण्यात आलेला आहे. यासाठी सुमारे साडेतीन किलो सोने वापरण्यात आलेले आहे.
अनंत चतुर्दशीला या गणेशमूतीर्चे विसर्जन न करता ही गणेशमूर्ती शहरातील फरशी भागात स्थापन करण्यात येते. दर संकष्ट चतुथीर्ला सत्यनारायण पूजन व इतर कार्यक्रम सुध्दा पार पडतात. एकूणच वेगवेगळ्या स्वरुपात गणेश मूर्ती स्थापन होत असताना खामगावातील ही गोल्ड गणेशमूर्ती भाविकांचे आकर्षण ठरत असून दूरवरुन भाविक दर्शनासाठी येत आहेत.