‘गोल्ड’ घेणाऱ्यांच्या घरी होवू शकेल बनावट ‘चोरी’
By admin | Published: November 14, 2016 02:58 PM2016-11-14T14:58:05+5:302016-11-14T14:58:05+5:30
सोने खरेदी करून भविष्यात आयकर अधिकाऱ्यांचा छापा पडण्याआधीच चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत देऊन आपले सोने सुरक्षित करण्याचा पर्याय राज्यभरातील अनेक धनिकांनी शोधल्याची वार्ता बाहेर येत आहे.
Next
>धनंजय कपाले/ ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 14 - मथळा वाचून धक्का बसला ना ! होय, अशा बनावट चोऱ्या होण्याची दाट शक्यता आहे. हजार-पाचशेच्या नोटा बंद झाल्यामुळे ज्यांच्याकडे काळा पैसा आहे, ते सुरक्षित पर्याय म्हणून सोने खरेदी करीत आहेत. सोने खरेदी करून भविष्यात आयकर अधिकाऱ्यांचा छापा पडण्याआधीच चोरी झाल्याची तक्रार पोलिसांत देऊन आपले सोने सुरक्षित करण्याचा पर्याय राज्यभरातील अनेक धनिकांनी शोधल्याची वार्ता बाहेर येत आहे.
हजार-पाचशेच्या नोटांवरील बंदी आल्यावर काळा पैसा जमा करणाºया धनिकांची चांगलीच पंचाईत झाली. अनेक धनिकांनी काळ्या पैशाची ‘वाट’ शोधण्यासाठी आपल्या चार्टड अकाउंटटच्या भेटी घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तज्ञांच्या सल्ला घेतल्यानंतर सराफा बाजारात अनेक धनिकांच्या उड्या पडल्यामुळे सोन्याचे दर तीन वर्षांच्या उच्चांकावर गेले. राजधानी दिल्लीत सोन्याचा भाव तब्बल ९०० रुपयांनी वाढून ३१, ७५० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीही १,१५० रुपयांनी वाढून ४५ हजार रुपये किलो झाली. नोटाबंदीचा निर्णय झाल्यामुळे ‘ब्लॅक मनी’ ला ‘व्हाईट’ करण्यासाठी धनाढ्य लोकांनी ४५ ते ४८ लाख रुपए किलोप्रमाणे सोने विकत घेतले.
काही सराफा व्यापाऱ्यांनी बिना पावतीचे सोने विकून स्वत:ची ‘चांदी’ करून घेतली. यामध्ये व्यापाऱ्यांनीही दोन लाखांच्यावर खरेदी करण्यासाठी पॅनकार्ड आवश्यक असल्याने धनिकांना दीड - दीड लाखाच्या तुकड्यात बनावट नावाने कोट्यावधीचे सोने विकून काळ्या पैशावाल्यांना मार्ग शोधून दिला. तर काही धनिकांनी ठोक स्वरूपात सोने घेऊन आपला पैसा सराफा व्यापाऱ्यांना देऊन सुटकेचा निश्वास टाकला.
या धनाढ्य लोकांना त्यांच्या ‘विशिष्ट सल्लागारांनी’ सोने खरेदी करून भविष्यात आपल्या घरी चोरी झाल्याची तक्रार दाखल करण्याचा ‘अनमोल’ सल्ला दिला. डिसेंबर महिण्यानंतर राज्यातील कुठल्याही पोलीस स्टेशनला मोठी चोरी झाल्याची तक्रार आल्यास त्यात नवल वाटू नये. आयकर अधिकाऱ्यांचा छापा पडण्याआधीच राज्यभरात धनिकांच्या घरी चोरीचे सत्र प्रारंभ होण्याची दाट शक्यता आहे.
"काळा पैसा व्हाईट करण्यासाठी राज्यभरातील अनेक धनिकांनी मोठ्या स्वरूपात सोने घेतल्याची बाब मलाही माहिती पडली. अनेक धनिकांनी दीड- दोन लाखाच्या तुकड्यात सोने घेतले तर काही धनिकांनी ठोक स्वरूपात साने घेतले हे खरे आहे. अशा प्रकारचे धनिक भविष्यात सोने चोरीला गेल्याची तक्रार देऊ शकतात, असे मलाही वाटते," असे वाशिम येथील चार्टर्ड अकाऊंटन्ट आनंदकुमार डोडिया यांनी सांगितले.