चिमुकल्याच्या घशातून काढले सोन्याचे पान
By Admin | Published: October 29, 2016 02:59 AM2016-10-29T02:59:57+5:302016-10-29T02:59:57+5:30
नऊ महिन्यांचा चिमुकला रडता-रडता अचानक उलट्या करू लागल्यामुळे घरचे घाबरले. उलट्या न थांबल्यामुळे गुरुवारी रात्री कूपर रुग्णालयात दाखल केले. यावेळी तपासणीत घशात
मुंबई : नऊ महिन्यांचा चिमुकला रडता-रडता अचानक उलट्या करू लागल्यामुळे घरचे घाबरले. उलट्या न थांबल्यामुळे गुरुवारी रात्री कूपर रुग्णालयात दाखल केले. यावेळी तपासणीत घशात काहीतरी अडकल्याचे निदान झाले. शुक्रवारी सकाळी एण्डोस्कोपी करून गळ््यात अडकलेले सोन्याचे पान काढण्यात डॉक्टरांना यश आले. ९ महिन्यांच्या बाळाच्या घशात अशा प्रकारे वस्तू अडकणे ही दुर्मीळ घटना असून शस्त्रक्रिया करणे जोखमीचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
आयुष सरोज असे या चिमुरड्याचे नाव आहे. तो गुरुवारी सायंकाळपासून रडत होता. रात्री त्याला उलट्या सुरू झाल्या. घरगुती उपचार करुनही आयुषला बरे वाटत नसल्याने रात्री १ वाजता त्याला कूपर रुग्णालयात दाखल केले. तेथे त्याच्या तपासण्या सुरू केल्या. यावेळी एक्स-रे मध्ये गळ्यात काही तरी बाहेरील घटक असल्याचे निदान झाले. शुक्रवारी सकाळी आयुषवर शस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती कूपर रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत म्हशळ यांनी दिली.
दोन वर्षांची मुले फिरायला लागल्यानंतर अशा गोष्टी तोंडात घालायला शिकतात. अनेकदा त्यांच्या गळ्यात या वस्तू अडकतात. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे तुलनेने सोपे असते. पण, नऊ महिन्यांचे मूल खूप लहान असते. त्यामुळे कॅमेऱ्याच्या साहाय्याने पाहून गळ्यात अडकलेले पान काढण्यात यश आले. अर्ध्या तासात ही शस्त्रक्रिया पूर्ण झाली. आता आयुषची प्रकृती स्थिर आहे. त्याला कोणताही त्रास होत नाही. पण, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याला रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, असे डॉ. शशिकांत यांनी सांगितले. कूपर रुग्णालयात एण्डोस्कोपीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया केल्या जातात. या तंत्रज्ञानाचा अनेकांना उपयोग होत असल्याचे कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
पालकांनी घ्या
विशेष काळजी!
लहान मुले घरात असणाऱ्या पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. घरातील वस्तू जागच्या जागी ठेवणे, लहान मुलांच्या हाती लागणार नाहीत, याकडे लक्ष दिले पाहिजे. विषारी अथवा टोकदार वस्तू गळ्यात अडकल्यास गुंतागुंत वाढू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.