फिरत्या चाकांवर खेळून पटकाविले सुवर्णपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2019 07:00 AM2019-07-07T07:00:00+5:302019-07-07T07:00:07+5:30
कारण ‘ती’ स्पेशल असली तरी, तिला घरात बसून नेहमीचं आयुष्य जगायचं नव्हतं.
- दीपक कुलकर्णी-
पुणे : आयुष्याला आव्हान दिलं की ते सोपं होतं म्हणतात..तसंच काहीसं तिच्याबाबतीत म्हणावं लागेल..कारण ‘ती’ स्पेशल असली तरी, तिला घरात बसून नेहमीचं आयुष्य जगायचं नव्हतं. कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून सुरु असलेलं आयुष्य तिने खडतर अशा बास्केटबॉल खेळण्यासाठी खर्ची करण्याचे ठरविले. त्यासाठी तिला प्रचंड सराव, संघर्ष करावा लागला आणि तिच्या या कठिण आव्हानाला सोनेरी मुकूटाने कळस चढविला. राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत तिने उत्तम कामगिरी केली आणि सांघिक सुवर्णपदक पटकाविण्यात यश मिळविले. तिचे नाव कोमल माळी. या स्पर्धेसाठी दररोज ती आठ तास सराव करीत होती.
कोमलचं मूळ गाव सांगली..पण सध्या ती पुण्यात वास्तव्याला आहे. पोलिओची शिकार झालेली कोमल दिव्यांगापेक्षा ‘ राष्ट्रीय खेळाडू ’ म्हणून तिची ओळख करुन देते तेव्हा आपल्यालाही दोन मिनिटं आश्चर्याचा धक्का बसतो. शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून तिने स्वत:च्या पायावर उभे राहणे पसंत केले.पण जेव्हा तिने सुख सोयीचे कम्फर्ट झोन आयुष्याला कलाटणी देत मुंबईला जाण्याचा निश्चय केला तेव्हा कुटुंबासह मित्र, मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडून प्रेरणेऐवजी पदरी अवहेलना मिळालीअमोल शिंगाडे यांचे इनेबल ट्र्स्ट आहे त्यांची मैदाने शोधण्यासाठी पार मदत झाली. पुढे आलोक मुनोत व त्यांच्या भगिनी मेघना मुनोत यांनी कोमलसह तिच्या सहकाºयांना मैदानापासून ते स्पोर्ट व्हीलचेअर,आहार, आरोग्य यांसह प्रत्येक गोष्टी उपलब्ध करुन देत खेळाडूंच्या यशाचा पाया रचला.मुंबईचे लुईस जॉर्ज, शरद नागणे, अँटनी परेरा यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यात सुराव सुरु केला.
अवघ्या अडीच महिन्यांच्या कालावधीत या मुलींना राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेला सामोरे जायचे होते. त्यामुळे सर्व खेळाडू मुलींनी सलग सात ते आठ तास सराव करुन प्रयत्न सुरु ठेवले. पुढे मुंबईच्या लुईस जॉर्ज यांनी पुण्यातील संघाला सरावासाठी मुंबईला बोलावले. तिथे राष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेसाठी खेळाडूंना प्रशिक्षिण देण्यात आले. मुनोत परिवार आणि त्यांच्या ओळखीतून मिळालेल्या मदतीतून खेळाडूंच्या विमान प्रवासासह इतर खर्च मार्गी लागला.पंजाबमधील मोहाली येथे आयोजित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत उत्तम सांघिक कामगिरीचे प्रदर्शन करत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला अशा दोन्ही गटात सुवर्णपदक मिळवत विजेतेपद पटकावले.
या प्रवासाबद्दल कोमल म्हणाली, सांगली ते मोहाली हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. पण अथक मेहनत, उत्तम मार्गदर्शन, माणुसकी जपणारे माणसं, कुटुंब यांच्यासहकार्यामुळेच हे यश मिळवता आले. म्हणून इथपर्यंतच्या प्रवासाने थकवा नाहीतर प्रेरणा मिळते.चाळीशीच्या उंबरठ्यावर घेतलेला करियर बदलाचा निर्णय खरा तर जोखमीचा होता. मात्र, या निवडलेल्या वाटेवर चालायचे ठरवले तसे सर्व प्रतिकुल परिस्थिती अनुकुल होत गेली.
...............
कोणत्याही क्रीडा प्रकारात खेळताना दिव्यांग खेळाडूंना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना सामान्य खेळाडूंच्या तुलनेत शारीरिक, मानसिक, मर्यादांवर त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागते.आजही आमच्यासारख्या दिव्यांग व्यक्तींना क्रीडा क्षेत्रात कामगिरी करताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. सरकारी पातळीवर याबाबत धोरणात्मक सुधारणा होणे गरजेचे आहे. पण सरकारी मदतीवर अवलंबून न राहता समाजाकडून देखील दिव्यांग खेळाडंूना कायम प्रोत्साहान मिळाले पाहिजे.
- कोमल माळी , बास्केटबॉल खेळाडू